Jindal कंपनीत भीषण स्फोट; आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र या कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, जवळपासच्या 20 ते 25 गावांमध्ये याचे पडसाद उमटले. या स्फोटामुळे कंपनीत जवळपास 100 पेक्षा जास्त कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती समजताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिंदाल कंपनीत सुमारे १ हजार हुन अधिक कामगार आहेत. यातील १०० हुन अधिक कामगार अडकल्याची शक्यता आहे. अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आग इतकी मोठी होती की धुराचे मोठ मोठे लोट आकाशात दिसत होते. कंपनीच्या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसून येत होते. सध्या अग्निशमन दलाचे आठ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत.