नोकरीच्या अमिषाने फसवणूक : पती- पत्नीस दिले बनावट नियुक्तीपत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | सातारा आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक व कृषी विभागात नोकरी लावतो असे सांगून बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 10 लाख 22 हजारांना गंडा घालण्यात आला असून निगडी येथील पती – पत्नीसह अन्य 6 जणांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी चार संशयितांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 20 जून 2022 या कालावधीत घडला आहे. रोहित उर्फ सागर सदाशिव पवार, ज्ञानेश्वर साळुंखे, निहाल ईनामदार (तिघे रा. पिंपरी ता. कोरेगाव, सातारा), विक्रम चव्हाण (रा. सातारा) अशी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल घोलप यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अमोल मधुकर घोलप (वय- 35), सौ. धनश्री मधुकर घोलप (रा. निगडी – मसूर, ता. कराड), सम्राट श्रीमंत नलवडे (रा. गमेवाडी ता. पाटण), अमोल कुमावत, सुरेश यमगर, तौसिफ शेख अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.

अमोल घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहित पवार व ज्ञानेश्वर साळुंखे यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक व पत्नीला कृषी सहाय्यक म्हणून नोकरीस लावणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी फिर्यादीच्या वडिलांनी दोघा संशयितांना जानेवारी 2022 मध्ये 2 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम निगडी येथे दिली होती. तर उर्वरित रक्कम दिनांक 6 मे 2022 रोजी 40 हजार रुपये व दिनांक 8 मे रोजी 20 हजार रुपये संशयित पवार याच्या फोन पे द्वारे ऑनलाईन दिले होते. तर फिर्यादी याचा मामे भाऊ सम्राट नलवडे याने कागदपत्रांसह 2 लाख 50 हजार रुपये, अमोल कुमावत याने 2 लाख रुपये, सुरेश यमगर याने 1 लाख रुपये व तोसिफ शेख याने 1 लाख 92 हजार रुपये असे एकूण 10 लाख 22 हजार रुपये संशयिताना दिले असल्याचे अमोल घोलप याने फिर्यादीत नमूद केले आहे.

संशयितांनी फिर्यादी व त्याची पत्नी सौ. धनश्री यांना 15 मार्चला नियुक्ती पत्रे देऊन 13 मे पासून ट्रेनिंग सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादी, त्यांची पत्नी यासह अन्य नातेवाईक जिल्हा परिषदेत गेले असता रोहित उर्फ सागर पवार हे मुंबई येथे गेले असून दोन दिवसांनी फोन करतो असे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी संशयितांना फोन लावले असता त्यांचे फोन बंद होते. त्यानंतर 20 जून रोजी फिर्यादी याचे वडील व मामा हे जिल्हा परिषद सातारा येथे चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी संशयित विक्रम चव्हाण या नावाची कोणतीही व्यक्ती काम करीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यावरून फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले असे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीवरून चार जणांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.