हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत IT सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. पण आता या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. NLB Services या टॅलेंट सोल्यूशन्स कंपनीच्या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सुरू झालेली सकारात्मकता 2025 पर्यंत अधिक गती घेईल आणि IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील , असे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच 2025 या नवीन वर्षात नोकऱ्यांची भरभराट दिसून येणार आहे.
2025 मध्ये रोजगाराची मोठी भरती –
अहवालानुसार 2025 मध्ये IT क्षेत्रात 15 ते 20 % नव्या नोकऱ्या निर्माण होतील. त्यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) यांसारख्या तंत्रज्ञान कौशल्यांसाठी 30 ते 35 टक्क्यांपर्यंत मागणी वाढणार आहे. त्यामुळे लोकांना अनेक रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगितले आहे.
AI सह मशीन लर्निंगचा सुवर्णकाळ –
गेल्या दोन वर्षांत AI, मशीन लर्निंग आणि क्लाऊड टेक्नॉलॉजीज या क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे एकीकडे नोकऱ्यांवर संकटाची भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. अनेकांच्या मते, AI आणि मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या लोकांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढणार आहे.
फ्रेशर्ससाठी फायदा –
2025 हे वर्ष फ्रेशर्ससाठी खूप चांगले ठरेल असे मानले जात आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या अवलंबामुळे नवीन कौशल्ये असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. कंपन्या केवळ भरतीच नाही तर स्किल डेव्हलपमेंटवरही भर देत आहेत. भारत हा IT क्षेत्रातील जागतिक आघाडीचा देश असून व्हाईट कॉलर जॉब्समध्ये भारताचे वर्चस्व आहे. काही कारणामुळे IT क्षेत्रात मंदी आली होती. पण, 2025 पर्यंत परिस्थिती सुधारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.