अस्वस्थ मनाचा ठाव घेणारा – ‘जोकर’

चित्रनगरी । योगेश नंदा सोमनाथ

माणूस घडत नाही, तो घडवला जातो असं म्हणतात. बदलाची प्रक्रिया जितकी आतून येते तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त त्याला समाजही कारणीभूत असतो. घडवणुकीच्या या प्रक्रियेत व्यक्ती कसा आहे, त्यापेक्षा तो कसा असायला हवा याचीच चर्चा जास्त होते. त्यामुळे उभा राहतो एक आदर्शवाद आणि चांगुलपणाचा बाजार. आजकाल लोकांना दुसऱ्याचा आनंद बघवेना का? कुणी चांगलं वागत असेल तर त्याकडं दुर्लक्ष का केलं जातं? सगळं काही चांगलंच चाललंय असं दिसत असताना, अस्वस्थ वर्तमानाचा खरा चेहरा नेहमी झाकलेलाच राहतो. याच चेहऱ्याला मुखवट्याचा आधार देऊन बदलू इच्छिणारा अवलिया म्हणजे जोकर.

गूढ चित्रपट बनवण्यात माहीर असलेल्या वॉर्नर ब्रदर्सने ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी, ११ तारखेला हा चित्रपट लोकांसमोर आणला. याचं टायमिंग परफेक्ट अशासाठी की ‘मानसिक आरोग्य’ हा चित्रपटाचा मूळ गाभा असून जगभरातील प्रेक्षकांना त्याचं गांभीर्य समजावं यासाठी वॉर्नर ब्रदर्सला ‘मानसिक आरोग्य जनजागृती सप्ताहा;पेक्षा उत्तम कालावधी मिळूच शकला नसता.

आर्थर फ्लेक या मनोरंजन करणाऱ्या व्यक्तीची ही कहाणी. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी व्यथित होणारा आर्थर स्वतःच्या दुबळेपणासोबत हसण्याच्या आजाराने व्यथित असतो. अस्वस्थ करणारं काही घडलं की आर्थरला रडायला येत नाही. तो फक्त हसतो. हसतच राहतो. आणि हे हसणं त्याला थांबवताही येत नाही. आर्थर त्याच्या आईसोबत (पेनी फ्लेक) राहत असतो. आर्थरचं आजारपण आणि आईचं मरणपंथाला टेकलेलं असणं या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झालेला असतो. आर्थरला विनोदवीर बनायचं असतं. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं असतं. लोकांना हसवायचं असतं. याची प्रेरणा त्याच्या आईने सांगितलेल्या ‘तुझा जन्मच लोकांना हसवण्यासाठी झालाय’ या वाक्यात दडलेली असते. टीव्हीवरील मेरी फ्रँकलिनच्या प्रसिद्ध टॉक शो मध्ये आपण जावं, लोकांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात असं आर्थरला मनोमन वाटत असतं. त्याच्या दुःख भरलेल्या जीवनात तेच स्वप्न त्यानं उराशी बाळगलेलं असतं. पण अडचण असते ती संधीची आणि परिस्थितीची.

आपण पूर्वाश्रमी काम करत असलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणचा मालक शहराच्या प्रमुखपदासाठी निवडणूक लढणार असतो, त्याच्याकडे मदत मागितली तर तो नक्की मदत करेल असं पेनी आर्थरला सांगत असते. आर्थर पेनीचा पत्रव्यवहार सांभाळत असून त्याला अशी कोणतीच मदत मिळणार नाही याबद्दल खात्री वाटत असते.

दरम्यान एका दुकानाबाहेर विचित्र पद्धतीचे हावभाव करत लोकांना हसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आर्थरवर काही तरुण हल्ला करतात. अशक्त असलेला आर्थर काहीच करू शकत नाही. समाज असा का वागतो याचा उलगडा त्यालाही होत नसतो. तो काम करत असलेल्या कंपनीतीलच एक सहकारी त्याला बचावासाठी पिस्तूल जवळ बाळगायचा सल्ला देतो. काही दिवसांनी एका रात्री रेल्वेतून प्रवास करत असताना ३ लोक एका महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात. हे चित्र पाहून अस्वस्थ झालेला आर्थर हसू लागतो. मोठमोठ्याने हसतो. ती महिला हा सगळा प्रकार पाहून डब्यातून निघून जाते. पण छेड काढायला आलेले तिघेजण आर्थरच्या अंगावर तुटून पडतात. ही मारहाण चालू असतानाच आर्थर आपल्याजवळील पिस्तुल काढतो आणि तिघांनाही गोळ्या घालतो. या प्रसंगाने संपूर्ण शहर हादरून जातं. शहरातील तीन श्रीमंत लोकांना एका मुखवटाधारी व्यक्तीने मारल्याच्या बातम्या सगळीकडे पसरतात. शहराच्या प्रमुखपदासाठी निवडणूक लढवणारा थॉमस नावाचा व्यक्ती मुखवटाधारी व्यक्तींना धडा शिकवला पाहिजे, ते निष्पाप श्रीमंतांवर अन्याय करतात या भाषेत पुढं बोलू लागतो तेव्हा मनोरंजन करणारे सर्व लोक एकत्र येतात आणि आपल्या हक्कांसाठी लढा उभारतात.

हा लढा कसा पुढे जातो? शहराचा प्रमुख कोण होतो? आर्थरच्या आईचं पुढे काय होतं? चित्रपटाला जोकर नाव कसं देण्यात आलं? आर्थरचा आजार ठीक होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘जोकर’ बघावाच लागेल. मानसिक आजारातून पुढे जाणाऱ्या व्यक्तीची घालमेल आर्थरने आपल्या अभिनयातून समर्पकरीत्या मांडली आहे. नाचणं, अभिनय करणं, स्वतः च्या भावना विसरून दुसऱ्यांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करणं हा जोकरचा स्थायीभाव आपल्याला परिचित आहे. जोकर बाह्यरूप यापेक्षा वेगळं नाहीच. पण व्यक्तीच्या अंतरंगातील जोकर कसा आहे? तो भूतकाळ आणि वर्तमानाची सांगड लावून काय विचार करतो यावर ‘जोकर’ने प्रकाश टाकला आहे. ही फक्त एका व्यक्तीची कहाणी नाही. हा एक धडा आहे – आवाज दबलेल्या व्यक्तींचा. ज्यांना खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं – पण ते सांगितलंच जात नाही. कारण ते समजून घेणारंच कुणी नसतं.. आणि घेतलंच तरी त्याचा अर्थ आपापल्या अनुभवांनी लावलेला असतो. ‘जीना इसी का नाम हैं, यहा हर किसिको वोही मिलता हैं जिसका वो हकदार हैं’ अशा झकास वाक्याने चित्रपट पुढे जातो. आणि हो चित्रपट संपत नाही बरं का, तो विचार करायला लावतो – माझ्यामध्ये पण आहे का एखादा ‘जोकर’

चित्रपट – जोकर (JOKER), २०१९
दिग्दर्शक – टॉड फिलिप्स
जोकवेन फिनिक्सने आर्थर फ्लेकची भूमिका साकारली आहे.
हॅलो महाराष्ट्र रेटिंग – ४.५/५

चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी लिंक –

You might also like