जुहू बीचवर मोठी दुर्घटना; 6 जण समुद्रात बुडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. या चक्रीवादळामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. आज जुहू चौपाटी बीचवर ६ जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी २ जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तर इतर चौघांचा शोध सुरु आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बाकी ४ जण बुडाले तरी नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.

सदर घटना ही आज संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ६ जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले आहेत. एकूण ६ जण बुडाले असून त्यातील २ जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून चौघांचा पत्ता अजूनही लागलेला नाही. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

खरं तर पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने समुद्र किनाऱ्यांवर येत आहेत. मात्र ‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु असे असतानाही काही लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उतरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.