शाडूचा गणपती, मोदक, सजावट अन् त्या गोड आठवणी, जुईने सांगितले गणेशोत्सवाचे खास किस्से

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणपती बाप्पाच्या मुर्त्या बनवणे, गणेश मंडळे उभी करणे, आरास तयार करणे, ढोल पथकांची तयारी अशा कित्येक गोष्टी अगदी उत्साहात केल्या जात आहेत. गणपती हा सर्वांचा आवडता देव असल्यामुळे त्याच्या आगमनामध्ये गणेश भक्त कोणतीही कमी पडू देत नाहीयेत. मुख्य म्हणजे, अशा उत्सवाच्या वातावरणातच अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) एका वृत्तवाहिनीशी बोलताना गणपती बाप्पासोबतच्या आपल्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.

मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जुईने म्हटले की, “गणपती बाप्पा (Ganesh Festival) हा आपल्या सर्वांच्या खूप जवळचा असतो. त्याला आपण अरे तुरे करू शकतो इतका तो आपल्याला जवळचा वाटतो. मी लहानपणापासून दरवर्षी गणपती बाप्पाकडे काही ना काही तरी मागत आली आहे आणि तोही मला भरभरून देत आला आहे. माझी एक वर्षी मागितलेली गोष्ट पुढच्या वर्षी बाप्पा येईपर्यंत पूर्ण झालेली असते. पण हल्ली मी त्याला काही मागत नाही. फक्त मी त्याचे आभार मानते. माझ्या मनातल्या गोष्टी बाप्पा ओळखतो. आमच्या घरी दीड दिवसांचा नवसाचा गणपती येतो. आमच्या बाप्पाला आता 150 वर्षे झाली आहेत”

आजीसोबतची खास आठवण

इतकेच नव्हे तर, तिने तिच्या आजी सोबतची एक खास आठवण देखील या मुलाखतीत सांगितले आहे. यावेळी बोलताना तिने सांगितले की, आमचे एकत्र कुटुंब पद्धती आहे. आम्ही सगळेजण एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करतो. 2014 साली आजीची प्रकृती खालावली होती. परंतु तरीदेखील ती स्वतःहून दुसऱ्या मजल्यावर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आली. त्यावेळी ती खूप छान दिसत होती, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होत. पण बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आजीला स्ट्रोक आला आणि सहा महिन्यांसाठी ती कोमात गेली आणि त्यानंतर ती परत आलीच नाही. आजीचे ते फोटो आम्ही आजही पाहतो”

त्याचबरोबर, “माझ्यासह घरातील सर्वच मंडळी खूप उत्साही आहेत. आता बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असून स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आमचा बाप्पा हा शाडूच्या मातीचा असतो. तसेच आमच्या घरच्या विहिरीतच बाप्पाचं विसर्जन होतं. बास्केटचा पाळणा बनवून त्याला विहिरीत सोडलं जातं. त्यामुळे बाप्पा कायम आपल्या जवळ आहे असं वाटतं. कापडी फुलं, लाकडाचा वापर करून पर्यावरणपूरक आरास बनवण्यावर आमचा भर असतो” अशी आठवण जुईने गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सांगितली आहे.