Jungle Book Theme Railway Station : मोगलीच्या गावात पोहोचणार ट्रेन ! प्लॅटफॉर्म वर भेटणार शेर खान, बघीरा आणि मोगली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jungle Book Theme Railway Station: मध्य प्रदेशातील सिवनी रेल्वे स्टेशन लवकरच जगातील पहिले ‘जंगल बुक’ थीमवर आधारित स्टेशन म्हणून ओळखले जाणार आहे. या खास संकल्पनेत मोगली, बघीरा, शेर खान यांसारख्या लोकप्रिय पात्रांच्या मूर्ती स्टेशन परिसरात बसवण्यात येणार असून, पर्यटकांसाठी हे एक वेगळे आकर्षण ठरणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १६ मे रोजी ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत १८ राज्यांतील ८६ जिल्ह्यांमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या १०३ स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत, ज्यात सिवनी रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत सिवनी स्टेशनचे रूपांतर थेट ‘जंगल बुक’ च्या (Jungle Book Theme Railway Station) जादुई जगात करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, सिवनी जिल्ह्याचा ‘जंगल बुक’ शी ऐतिहासिक आणि साहित्यिक संबंध आहे. मोगली ही व्यक्तिरेखा सिवनीतील पेंच नॅशनल पार्कच्या जंगलात भेड़ियांसोबत वाढल्याचे सांगितले जाते. रुडयार्ड किपलिंग यांचे प्रसिद्ध साहित्य ‘जंगल बुक’ याच भागावर आधारित आहे.

सिवनी स्टेशनवर लवकरच मोगली, बघीरा आणि शेर खानसारख्या पात्रांचे शिल्प उभारले जाणार असून, हे विशेषतः मुलांसाठी आणि साहित्यप्रेमींसाठी एक अनोखा अनुभव ठरेल. यामुळे सिवनी स्थानक पर्यटनदृष्ट्या अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

या योजनेत सिवनीसह ओरछा स्टेशनचेही रुपांतर करण्यात आले असून ते आता ‘रामकथा पार्क’ म्हणून सजले आहे. देशभरातील ११०० कोटी रुपयांच्या खर्चात १०३ स्टेशनना नव्या रुपात सादर करण्यात येत आहे. याशिवाय २६,००० कोटींच्या इतर प्रकल्पांवरही काम सुरू आहे.

‘जंगल बुक’ आणि सिवनी यांचा संबंध आणखी खोल आहे. ब्रिटिश अधिकारी सर विल्यम हेनरी स्लीमन यांनी १८३१ मध्ये लिहिलेल्या दस्तऐवजांत सिवनीच्या संतबावडी गावात भेड़ियांसोबत राहत असलेल्या मुलाचा उल्लेख आहे. किपलिंग यांच्या कथेत वर्णन केलेल्या ठिकाणी – बैनगंगा नदी, तिचे किनारे, आणि आसपासचे जंगल – हे सर्व सिवनी परिसराशी साम्य राखतात.

सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यांत विस्तारलेले पेंच नॅशनल पार्क सुमारे ७५० चौ.किमी क्षेत्रात पसरलेले असून, ते जंगल बुकप्रेमींसाठी एक जिवंत आठवण आहे. नागपूरच्या सोनगाव एअरपोर्टपासून केवळ ९३ किमी अंतरावर असलेले हे अभयारण्य, निसर्गप्रेमी आणि कुटुंबांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरत आहे.

जर तुम्हालाही मोगलीच्या जंगलातील साहस अनुभवायचे असेल, तर सिवनी रेल्वे स्टेशनवरून सुरू होणारी ही ‘जंगल बुक’ सफर एकदा नक्की घ्या!