हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. परंतु अशा वातावरणातच शुक्रवारी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेत छगन भुजबळ यांनी सर्वांना मोठा धक्का दिला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्यानंतर आता शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे (Dr. Jyoti Mete) यांनी देखील लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी व्यापक समाजहित लक्षात घेऊन मतांचे विभाजन होऊ नये म्हणून घेतली असल्याचे सांगितले आहे.
माघार घेण्याचे दिले हे कारण
बीडमधील पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या की, “मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत आहे.” त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच निवडणुकीतून माघार घेण्यामागे दुसरे कोणते कारण आहे का? याबाबत देखील तर्क-वितर्क लावले जात आहे.
त्याचबरोबर, “मी लोकसभा निवडणूक लढवावी असा जनतेचाच होरा होता. त्यामुळे त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, पुढील भूमिका ही लवकरच स्पष्ट करणार आहे” अशी माहिती ज्योती मेटे यांनी दिली आहे. दरम्यान, मधल्या काळामध्ये ज्योती मेटे या देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची ही भेट घेतली होती. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्यानंतर ज्योती मेटे या आघाडीच्या उमेदवाराला की महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.