हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Kalyan Latur Expressway । मागील काही वर्षात महाराष्ट्रात रस्त्याच्या कामांना कामे अनेक जिल्ह्यात गती आली आहे. ठिकठिकाणी नवनवीन उड्डाणपूल, महामार्ग उभारले जात आहेत. यामुळे वाहतूक आणि दळणवळण सोप्प आणि आरामदायी झालेय. आता महाराष्ट्र सरकारने आणखी एक महामार्गाला मंजुरी दिली आहे. लातूर ते कल्याण असा हा नवा महामार्ग असून या प्रकल्पामुळे मराठवाडा आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी आणखी जलद होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेला हा महामार्ग जवळपास ४४२ किलोमीटर लांबीचा असून प्रवासाच्या वेळेची बचत करणारा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये एमएसआरडीसीच्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत या महामार्गाला (Kalyan Latur Expressway )तत्त्वत मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी आता शक्य झाली आहे. एमएसआरडीसी या प्रकल्पासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतर आराखड्याचे काम सुरू होईल. अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की डीपीआर तयार करणे, मंजुरी मिळवणे आणि पायाभूत काम करण्यासाठी अंदाजे १२ ते १८ महिने लागतील. यानंतरच प्रत्यक्ष रस्ते उभारणीला सुरुवात होईल.
कुठून कसा जाणार महामार्ग – Kalyan Latur Expressway
कल्याण ते लातूर हा प्रस्तावित महामार्ग माळशेज घाटातून जाईल आणि अहमदनगर, बीड, मांजरसुंबा आणि अंबाजोगाई मार्गे लातूरला पोहोचेल. लातूर शहराच्या पलीकडे, हा कॉरिडॉर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत विस्तारेल. याव्यतिरिक्त, हा एक्सप्रेस वे आगामी विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉरशी जोडला जाईल. या कनेक्शनमुळे प्रवाशांना मुंबई आणि उपनगरात सहज प्रवास करता येईल. सध्या लातूर वरून कल्याणला जायचं म्हंटल तर १०-१२ तास लागतात, मात्र एकदा हा महामार्ग तयार झाला तर हेच अंतर ५ तासांत गाठणं शक्य होणार आहे. मराठवाड्यातून मुंबईला शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेल्या प्रवाशांसाठी हा नवा महामार्ग वरदान ठरणार आहे.




