Kalyan Lok Sabha Election 2024 : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे कोणाला मैदानात उतरवणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या संथ राजकारणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून क्लायमॅक्स आणला.. यानंतर सत्तेसाठी रंगलेला सगळा सारीपाट आपल्याला एकंदरीत माहित आहेच. मात्र शिवसेनेतल्या या उभ्या फुटीमुळे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha 2024) समीकरणही पुरतं बदलून गेलंय. शिवसेनेकडून सलग दोन टर्म या मतदारसंघात मोठ्या लीडने आणि बिनदिक्कत निवडून येणाऱ्या श्रीकांत शिंदे यांना आता युतीतीलच भाजपाने आडवं लावलंय. एवढेच काय तर शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे ठाकरेंनीही शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लावलीय. कल्याणच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात इतका वाद का सुरूय? आपल्या मुलाला काही केल्या खासदारकी पुन्हा जिंकवून देण्यासाठी मुख्यमंत्री आपली सारी यंत्रणा कामाला लावणार असल्याने त्यांचे विरोधात ठाकरे गटाचा नेमका कोणता उमेदवार हमखास विजय खेचून आणू शकतो? कल्याण लोकसभेचे लोकल पॉलिटिक्स नेमकं काय सांगतय? याबाबत आज आपण सविस्तर आढावा घेऊया…

गेल्या दहा वर्षांच्या काळात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी या मतदारसंघात विकासकामांचा पाउस पाडला आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. विशेषत: मागील साडेचार वर्षात घडलेल्या घडामोडी त्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागासारखे महत्वाचे खाते आले. त्यानंतर ते थेट मुख्यमंत्री झाले. या दोन्ही खेपेला नगरविकास विभाग शिंदे यांच्याकडे असल्याने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ यासारख्या मोठया संस्थांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची कामे मतदारसंघात सुरु करण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांना यश आले.

मतदारसंघात रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, खाडी पूलाची कामांचा धडाका या काळात लावण्यात आला. अंबरनाथ परिसरात शिवमंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलताना खासदारांनी एरवी विकासापासून दूर असलेल्या या पट्टयातही कामांचा धडाका लावला. हवे ते अधिकारी आणि हवा तितका शासकीय निधी मिळाल्याने खासदार म्हणतील ती पुर्वदिशा असा कारभार या मतदारसंघात आहे. त्यामुळे शिंदे यांना कल्याणमधून विरोधकांना आव्हान उभं करणं तसं जिकिरीचं काम आहे. मात्र मधल्या काळात भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून बरीच धरपकड झाली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा आपल्यालाच सुटली पाहिजे यासाठी सभा, मोर्चे आणि युतीत असतानाही खासदारांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी केल्या. भाजप पक्षश्रेष्ठी सुद्धा या जागेसाठी अडून बसलेत आणि हा सारा काही वाद त्यांच्याच संगनमताने सुरू आहे हे जेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या ध्यानात आलं तेव्हा त्यांनी खासदारकीच्या राजीनाम्याची गोष्ट बोलून दाखवली. भाजप आणि शिंदे गटातील संबंधही चांगलेच ताणले गेले.

कल्याणमध्ये Shrikant Shinde यांची कोंडी; खासदारकी टिकवण्याचं आव्हान | Eknath Shinde

अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच समोर येत भाजप या जागेवर दावा करणार नाही असं म्हणून झालेल्या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकला. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा असली तरी महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील याचे चान्सेस जास्त आहेत. मात्र शिंदे यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल एवढं मात्र नक्की!

कल्याण मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, ग्रामीण, डोंबिवली, कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. उर्वरित मतदारसंघांमध्ये भाजप, मनसे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आतापर्यंत डोंबिवली मतदार संघ युतीच्या उमेदवाराला लीड म्हणून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या मतदारसंघातून भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आमदार आहेत. मात्र हे मत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत याच मुद्द्याला धरून केलं जातं. त्यामुळे शिंदे चव्हाण यांना मतदार संघात फारसं इंटरटेन करताना पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे युतीचा उमेदवार या टॅगखाली शिंदे यांना निवडणूकीत मोठी लीड सहजपणे मिळून जाते.

मात्र 2024 उजाडता उजाडता पक्षात अनेक गटतट तयार झालेत अशा वातावरणात शिंदेंना टफ फाईट देईल, असा विरोधी उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न आता ठाकरेंना पडलाय. कळवा-मुंब्रा हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे असला तरी आव्हाड आपल्या मतदारसंघापलीकडे मात्र फारसे ऍक्टिव्ह नाहीयेत. तसेच मावळत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना म्हणावी अशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाहीये. तसंच काँग्रेसचा अजून या बालेकिल्ल्यात बेस तयार झालेला नाही त्यामुळे महाविकास आघाडीची जागा ठाकरे गटाला मिळणार हे क्लिअर आहे. ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांच्या नावाची अधूनमधून चर्चा होत असते. मात्र अजून याबाबत क्लियारीटी अजून पक्षाकडून देण्यात आलेली नाहीये. दुसरीकडे सुषमा अंधारे यांना कल्याणमधूनच ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याचा हट्ट स्थानिक शिवसैनिकांनी केलाय. त्यामुळे ठाकरे गटातील मुलुख मैदानी तोफ येत्या काळात श्रीकांत ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात भिडताना दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. याशिवाय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनाही उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा निवडणुकीत तिकीट देऊन मोठा मास्टरस्ट्रोक खेळू शकतात.

कल्याण लोकसभा ही कळवा ते अंबरनाथ पर्यंत आहे. या लोकसभेत सहा विधानसभा आहेत मुंब्रा कळवा विधानसभा राष्ट्रवादीकडे आहेत. तर उल्हासनगर विधान सभा भारतीय जनता पार्टीकडे आहे. कल्याण ग्रामीण मनसेकडे आहे आणि अंबरनाथ शिवसेनेकडे आहे डोंबिवली विधान सभा भाजपकडे आहे. कल्याण पूर्व विधान सभा भाजपकडेच आहे. त्यामुळे मतदारसंघात भाजपचे आमदार जास्त असले तरी लोकसभाही शिवसेनाच जिंकत आल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे भाजपचं मिशन 400 प्लस पूर्ण करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते ही जागा शिंदे गटाला सहजासहजी सोडणार नाही एवढं मात्र नक्की! दुसरीकडे कल्याण लोकसभेत मनसेचा एक आमदार असून राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजही राज ठाकरे यांची क्रेज टिकून राहिली आहे. मुंबईला लोकलमधून कामाला जाणारा मोठा वर्ग आहे. या वर्गाचे प्रश्न मनसे आमदार राजू पाटील नेहमी मांडत असतात. त्यामुळे ही जनता मनसेसोबत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.मात्र खासदार शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या फारसे पटत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र मनसेची वाटचाल सध्या महायुतीच्या दिशेने चालली आहे त्यामुळे श्रीकांत शिंदेंसाठी हा प्लस पॉईंट आहे.

मतदार संघाच्या स्थापनेपासूनच खासदारांनी कल्याणच्या विकासाला खीळ बसवली होती. मात्र मागील दोन टर्म सत्ताधारी गटात असल्यामुळे आणि मागील दोन वर्षात सत्तेच्या चाव्या वडिलांकडेच आल्याने कल्याणमध्ये विकासकामांचा धडाका शिंदेंनी चालवलाय. शिवाय मतदारसंघात आपली स्ट्राँग व्होटबँकही शिंदेंच्या बाजूने आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार निवडीचा पॅटर्न पाहिला तर तो हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठिंबा देणाराच राहिलाय. त्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीत महायुतीचं पारडं जड असल्यामुळे श्रीकांत शिंदे यांना वरचढ ठरणारा उमेदवार अद्याप तरी महाविकास आघाडीकडे नाहीये.
त्यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सध्याची लोकप्रियता आणि शिवसैनिकांचा अट्टाहास पाहता त्यांना शिंदेंच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं जाईल का? हे पाहावं लागेल.