मोदींनी चीनला ५६ इंच छाती दाखवावी – कपिल सिब्बल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कलम ३७०च्या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन केले आहे. मोदी यांनी शी यांना ५६ इंच छाती दाखवावी आणि त्यांच्या नजरेला नजर भिडवून काश्मीरमधील पाच हजार किलोमीटरचा परिसर सोडायला सांगावा, असं आव्हान सिब्बल यांनी दिलं.

शी यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘शी जिनपिंग यांनी कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे मोदी यांनी महाबलिपुरम येथे चीनचे अध्यक्ष शी यांच्या नजरेला नजर भिडवून सांगायला हवं की काश्मीरमधील ताब्यात घेतलेला पाच हजार किलोमीटरचा परिसर चीनने सोडावा आणि भारतात ५जीसाठी हुवावेला परवानगी नाहीच!. मोदींनी त्यांना आपली ५६ इंच छाती दाखवावी; अन्यथा त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत?’ असं सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं. हाँगकाँगमधील निदर्शने आणि शिनजियांगमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्यावरून चीनला का जाब विचारत नाही, असा सवाल तिवारींनी सरकारला केला. ‘शी जिनपिंग म्हणतात की, ते काश्मीरवर लक्ष ठेवून आहेत. आम्हीही हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलकांची गळचेपी, शिनजियांगमध्ये मानवाधिकारांचे होत असलेले उल्लंघन आणि तिबेटमध्ये सुरू असलेले अत्याचार पाहत आहोत, असा जाब पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय का विचारत नाही,’ असं तिवारींनी म्हटलं आहे.

इतर काही बातम्या- 

 

 

 

Leave a Comment