स्वच्छ- सुंदर नव्हे तर खड्ड्यांचे शहर म्हणून आता कराडची ओळख?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
स्वच्छ सुंदर शहर स्पर्धेत देशपातळीवर बाजी मारणाऱ्या कराड शहरात तुमचे स्वागत करण्यासाठी खड्डेच- खड्डे आहेत. शहरात कोणत्याही रस्त्याने तुम्ही प्रवेश कराल, तेथे तुमच्या स्वागतासाठी मोठ- मोठे खड्डे आहेत. शहराच्या प्रवेशाद्वारावर अपघात होवून अनेकजण जखमी होत आहेत. आता एखाद्याचा जीव जाण्याची वेळ पालिका पाहतेय का? अन् शहरातील मेहरबानही केवळ आगामी निवडणुकीकडे डोळा ठेवून बसलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केली जावू लागला आहे. आता कराड शहरात येणारा पाहुणा अन् शहरातील शेकडो खड्ड्यामुळे नागरिकही त्रस्त झालेला आहे.

कराड शहरात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी सर्वात प्रमुख रस्ता कोल्हापूर नाका आहे. कोल्हापूर नाका येथे मुख्य हायवेवर बाहेर पडण्यासाठी संगम हाॅटेल समोर उड्डाण पूलाखाली एवढा मोठा खड्डा आहे की, तेथे एसटी बस, ट्रक हे सहजासहजी बाहेर पडत नाहीत. त्या खड्ड्यात एखादी गाडी अडकली तर कसरत करावी लागते. पुढे पोपटभाई पेट्रोल पंप नजीकही खड्डेच- खड्डे आहेत. दुसरा मार्ग जुना कोयना पूल खुला केला आहे, मात्र शासकीय विश्रामगृह ते शाहू चाैक येथे जीव मुठीत घेवून वाहन चालक प्रवास करत आहेत. तेव्हा अशी परिस्थिती असताना येथील माजी व आगामी इच्छुक मेहरबान कुठे गायब आहेत, असा सवाल शहरात येणारे प्रवासी आणि वाहन चालक करत आहेत. तरीही मेहेरबान अन् अधिकारी आळीमिळी गूप चिळी करून बसले आहेत.

कराड शहरात तासगावकडून येणारी वाहने व प्रवाशी अक्षरशः जीव मुठीत घेवून शहरात प्रवेश करत आहेत. भेदा चाैकात काही दिवसापूर्वी नगपालिकेचे काही कर्मचारी एक दिवस ट्रक्टर, खोरे, मुरूम, खडी घेवून तावातावाने रस्ता दुरूस्तीसाठी आली. त्यांनी कामही केले पण पुन्हा 15 दिवसात जैसै थे परिस्थीती आहे. तेथून पुढे कराड बसस्थानकाकडे येणारा उर्दू हायस्कूल समोर तर मुरूम टाकला अन् वाहूनही गेला. अक्षरशः एखादा ग्रामीण भागतला रस्ता बरा पण येथील दगड, धोंडे यातून प्रवास करायचा म्हणजे अपघातला निमंत्रण देणे असेच होय.

कराड- विटा मार्गावर कृष्णा नदीवर नवीन पूल झाला. मात्र, कनाॅलवर मुख्य चाैकात खोदकाम करून ठेवल्याप्रमाणे खड्डे पडलेले आहेत. दोन- दोन फूट गाडीचे टायर त्या खड्ड्यात अपटतात. तर कनाॅलवरून कराड शहरात येताना गॅस आॅफिस शेजारी मोठा खड्डा पडलेला आहे. या सर्व खड्ड्यामुळे कराड स्वच्छ सुंदर शहर नव्हे तर खड्ड्याचे शहर म्हणून आता कराड शहराला ओळख मिळेल, यात काही शंका नाही. तेव्हा झोपी गेलेले, जनतेचा कळवळा असलेले मेहरबान केव्हा जागे होणार देव जाणे.