व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड जनता बॅंक : बोगस कर्जप्रकरणात अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधकासह 27 जणांवर गुन्हा

कराड | कराड जनता बँकेने कर्मचार्‍यांना दिलेल्या कर्जप्रकरणात बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह तब्बल 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच कर्मचार्‍यांच्या कर्ज प्रकरणाचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कायदेशीर नियमांचा भंग, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणुकीच्या उद्देशाने कृत्य करणे अशा विविध कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद बॅंकेचे कर्मचारी कराड जनता बँकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सूर्यवंशी तसेच संचालक विकास धुमाळ, राजीव शाह, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम शिंगण, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश तवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ. परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल यादव, संजय जाधव, वियजकुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील व भाऊसाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र देसाई यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, कराड जनता बँकेच्या सुमारे 296 कर्माचार्‍यांच्या नावावर तत्कालीन संचालक मंडळाने 4 कोटी 52 लाख 87 हजारांची कर्जे उचलली. कर्मचार्‍यांची 2016 मध्ये बैठक घेवून कर्मचार्‍यांनी कर्ज काढून द्यावीत, ती कर्जे संचालक मंडळ फेडेल, असे जाहीर केले होते. त्यावेळची कर्जे तत्कालीन अधिकार्‍यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये अस्तीत्वात आणली. त्या कर्जांची रक्कम वाठारकरांच्या निकटच्या तीन मित्रांसह अन्य कर्जदारांच्या खात्यावर वेगवेगळ्या पद्धतीने जमा केली. तो प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन पोलिस तपास करीत आहेत.