कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड गेली 16 महिन्यापासून सुरु असलेला कराडच्या श्री मारुती बुवा कराडकर मठाच्या मठाधिपतीच्या वादाने मठाची नाहक बदनामी झालेली असून मठाच्या भवितव्याचा विचार करीत या वादावर कायमचा पडदा पडावा, यासाठी एकादशीदिवशी क्षेत्र पंढरपूर येथील मारुतीबुवा कराडकर मठात झालेल्या वारकरी संप्रदायाच्या बैठकीत कराडचा मठाधिपती हा चिठ्ठीद्वारे निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चिठ्ठीद्वारे होणारे मठाधिपती कोण असणार? याकडे समस्त वारकर्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
श्री मारुती बुवा कराडकर मठातील मठाधिपतीचा वाद न्यायप्रविष्ठ बाब बनली असून याचा निकाल लवकर लागणार नाही. हे गृहीत धरुन वारकरी मंडळांनी मठाच्या भवितव्याचा विचार करुन या बैठकीचे आयोजन केले होते. एक मठ व दोन मठाधिपती या वादामुळे मठाची वारकरी परंपरा खंडीत झाल्याने सर्वसामान्य जनता भरडली गेली. मठाच्या परंपरेनुसार मठाधिपतीची निवड ही गुरु-शिष्य परंपरेनुसार आहे. परंतू पेच प्रसंगात मात्र चिठ्ठीद्वारे मठाधिपती नेमण्याची सुध्दा रीत आहे. वैकुंठवासी गुरुवर्य भगवानमामा कराडकर यांची निवड देखील चिठ्ठीद्वारेच झाली होती.
त्यानुसार हा वाद मिटवण्यासाठी चिठ्ठी प्रक्रिया राबवून मठाधिपतीची निवड व्हावी, यावर वारकरी मंडळाचे एकमत झाले. या बैठकीस ह. भ. प. आनंदराव आप्पा कापिलकर, ह. भ. प. जोतिराम महाराज करवडीकर, ह. भ. प. रघुमामा चितळीकर, आबा माऊली कोडोलीकर, पांडूरंग टेलर विंगकर यांची उपस्थिती होती. या वादावर अखेर तोडगा निघाला असून भविष्यात चिठ्ठीद्वारे मठाधिपती ची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची लवकरच प्रक्रिया चालू होणार असल्याचे वारकरी मंडळींनी सांगितले.
समस्त भाविकांचा निर्णय मान्य
मठाच्या भवितव्यासाठी व मठाधिपतीवरुन सुरु असलेला वाद मिटावा. यासाठी समस्त वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी चिठ्ठीद्वारे मठाधिपती निवडीचा घेतलेला हा निर्णय मला मान्य आहे. समाधीवर चिठ्ठी टाकून नाना महाराज जो निर्णय देतील तो सर्वानी मान्य करुया. ज्यांच्या नावाची चिठ्ठी निघेल तेच आपले मठाधिपती असतील.बाजीराव मामा कराडकर