कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
थकीत कर वसुलीसाठी कराड नगरपालिकेची धडक कारवाई सुरु आहे. या कारवाई अंतर्गत आज अखेर 152 नळ कनेक्शन, 14 ड्रेनेज कनेक्शन कट करण्यात आले आहे तर 8 मिळकती सील करण्यात आली आहे. नगरपालिकेने विशेष वसुली अभियान अंतर्गत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे
या मिळकतदारांना वारंवार सूचना देण्यात आल्या असूनही त्यांनी अद्याप कर भरलेले नाहीत यामुळे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक उमेश महादर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान 31 मार्च 2023 पर्यंत मालमत्ता कर व पाणी कर भरणार नाहीत अशा मिळकत धारकांची नावे थकबाकी रकमेसह 10 एप्रिल पासून फ्लेक्स बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.. याशिवाय मिळकत धारकांना कर भरता यावा यासाठी वेळेत वाढ करून सायंकाळी आठ वाजेपर्यंत कर व पाणीपट्टी भरून घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 31 मार्च रोजी ही सुविधा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
नगरपालिकेची घरपट्टीची थकबाकी 21 कोटी 15 हजार असून, आज अखेर घरपट्टीची एकूण वसुली 14 कोटी 36 लाख 85 हजार इतकी झालेली असून, अद्याप 6 कोटी 63 लाख 30 हजार इतकी देणे बाकी आहे. पाणीपट्टीची थकबाकी 3 कोटी 88 लाख 23 हजार इतकी असून, आजअखेर पाणीपट्टीची एकूण 1 कोटी 79 लाख 35 हजार इतकी वी झालेली असून, अद्याप 4 कोटी 8 लाख 88 हजार इतकी येणेबाकी वसुली करावयाची आहे. पव एकूण थकबाकी 10 कोटी 72 लाख 18 हजार इतकी आहे.