कराड प्रतिनिधी : कृष्णा कोयना नदीचा संगम असलेल्या प्रीतीसंगम घाटावर एका मुलीचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रेठरे धरण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सेजल बनसोडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत कराड येथील घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मुळची सांगली जिल्हातील सेजल ही कराडमधील आपल्या नातेवाईकांकडे आलेली होती. कराड येथील कृष्णा कोयना नदीचा संगम झालेल्या प्रीतीसंगम घाटावर सेजल बनसोडे आपल्या नातेवाईकासोबत सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिरण्यास गेलेली होती.
नातेवाईक आणि ती आणि तीचे कुटुंबीय प्रीतीसंगम घाटावरती फिरुन झाल्यानंतर संगमावरती गेले. यावेळी चार मुली नदीपात्रात उतरल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते. मात्र, थोडे अंतर नदीमध्ये गेल्यानंतर चार पैकी एका मुलीचा हात सुटला आणि ती मुलगी नदीपात्रामध्ये बुडाली.
नदीपात्रामध्ये बुडाल्यानंतर तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. साधारण दोन तास शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यानंतर या मुलीचा मृतदेह कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन नेण्यात आला.