Satara News : कराड पोलीस ॲक्शन मोडवर! इंटरनेट सुरू होताच आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 8 जणांना नोटीसा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या दंगलीचे कारण सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्ट आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले असून सोशल मिदियात कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा कराड शहर पोलिसांनी आज बजावल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या ग्रुपच्या 8 जणांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना पहिल्या टप्प्यांमध्ये पोलीस स्टेशनला बोलवून समज देण्यात आली आहे.

पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये जमाव बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या कालावधीमध्ये सामाजिक स्वास्थ बिघडवणे, मोर्चा काढणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे, अशा गोष्टीला बंदी आहे. असे असतानाही काही जणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली.

पोस्ट टाकणाऱ्या 5 जणांवर कारवाई केली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून योग्य ती समजही देण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात दंगल उसळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गेली तीन दिवस बंद करण्यात आली होती. इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी पोलिसांकडून सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा व त्यातील सर्व तालुका पोलीस ठाण्याला महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या वतीने सोशल मीडिया वापरर्ते आणि Whatsapp ग्रुप ऍडमिनना प्रसिध्दी पत्रक काढून सूचक इशारा देण्यात आलेला आहे. सोशल मीडियाचा कोणीही अफवा व चुकीच्या गोष्टी पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.