कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा धक्का ? रोहित पवारांचं राजकारण संपणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोहित पवार… बारामतीच्या पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या राजकारणातील तरुण चेहरा… 2019 मध्ये दुष्काळी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघातून भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांना आव्हान देतो… आणि आमदार होतो… आपल्या पहिल्याच टर्म मध्ये रोहित पवारांनी राज्याच्या राजकारणात आपला एक बेस सेट केलाय… राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांसोबत राहिल्याने… आणि नंतर सतत शरद पवारांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे असलेल्या रोहित दादांनी तुतारीच्या राष्ट्रवादीचा पॉलिटिकल स्पेस भरून काढलाय…. पण प्रदेशाध्यक्ष पद… मुख्यमंत्रीपद… डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारे रोहित पवार कर्जत जामखेडचेच आमदार होत नाहीत, असं आम्ही का म्हणतोय? राम शिंदें सोबत त्यांना आव्हान देण्यासाठी नक्की कोण तयारी करतय? कर्जत जामखेड चा 2024 चा आमदार कोण? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

आधी काँग्रेसच्या… आणि नंतर तब्बल २५ वर्षे भाजपच्या ताब्यात असल्याने कर्जत जामखेड मतदार संघाला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं… 1995 पासून भाजपच्या सदाशिव लोखंडे यांनी हॅट्रिक मारत सलग तीन टर्म कर्जत जामखेडवर भाजपचा दबदबा कायम ठेवला… 2009 ला भाजपचा हा वारसा राम शिंदे यांनी आपल्याकडे घेतला… 2009, 2014 अशा सलग दोन टर्म त्यांनी जिंकत मतदारसंघावरचं आपलं वर्चस्व सिद्ध केलं… देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे, आतल्या गोटातले, विश्वासू समजले जात असल्यानं फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री पदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली… अर्थात या दोन्ही वेळेस परंपरेप्रमाणे काँग्रेसने विरोधात लढत दिली… 2009 ला बापूसाहेब देशमुख तर 2014 ला किरण पाटील यांनी हाताच्या पंजावर आमदारकीसाठी नशीब आजमावलं… पण राम शिंदे यांच्यापुढे त्यांचं काही चालू शकलं नाही… अशातच उजाडली 2019 ची विधानसभा निवडणूक…

Karjat Jamkhed विधानसभा मतदारसंघात, राष्ट्रवादीला मोठा धक्का | Rohit Pawar यांचं राजकारण संपणार?

स्वाभाविकपणे भाजपकडून राम शिंदे यांच्याच नावावर उमेदवारीचा शिक्का पडला… पण दुसऱ्या बाजूला आघाडीत काँग्रेसने तडजोड करत ही जागा राष्ट्रवादीला सोडली… पवारांनीही मोठा डाव टाकत इथून उमेदवार दिला तो म्हणजे रोहित पवार… अर्थात रोहित पवार उमेदवारी मिळण्याच्या आधीच मतदार संघात तळ ठोकून होते… पवार कुटुंबाने, पक्षाने आणि आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसनेही रोहित पवार यांचं मनापासून काम केल्याने तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांना पराभवाचा दणका देत रोहित पवार आमदार झाले… त्यांनी विजयाचा गुलाल उधळला… फडणीसांच्या अत्यंत जवळचे मानले जात असूनही शिंदेंचा पराभव झाल्याने भाजपलाही ही सल टोचत होती… फडणीसांनी म्हणूनच शिंदे यांची विधान परिषदेवर वर्णी लावत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंच, पण सोबतच कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मतदारसंघात विरोधक जिवंत ठेवला… तेव्हापासून विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात किती आणि कसा राजकीय विस्तव पडला? हा दुसऱ्या संशोधनाचा विषय…

इथला मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचे राजकारण बदलत गेलं तसे त्याचे पडसादही पाहायला मिळाले… राष्ट्रवादीत फूट पडली… त्यामुळे पक्ष दोन गटात विभागला गेला… रोहित पवारांची मतदार संघातील ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली… त्यात काट्याने काटा काढावा असा अजितदादा आणि रोहित दादा यांच्यातला राजकीय संघर्ष आपण रोज पाहत आहोतच… लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला रोहित दादांनी अक्षरशा जाम केलं होतं… सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष फिल्डवरती रोहित पवार थेट पंगा घेत होते… अर्थात याची परतफेड येणाऱ्या विधानसभेला अजित दादा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात करू शकतात… त्यांना मानणारा एक गट आजही मतदारसंघात सक्रिय आहेच… त्यामुळे महायुतीकडून राम शिंदे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असतील, याबाबत नो डाऊट… पण खरा पेच आहे तो राष्ट्रवादीमध्ये…

ज्याचा आमदार त्याला उमेदवारी… असा फॉर्म्युला विधानसभेला असेल असं जरी बोललं जात असलं तरीदेखील मतदार संघातील काँग्रेस आणि रोहित पवार यांच्यात काही आलबेल असल्याचं दिसत नाही… म्हणूनच राष्ट्रवादीतील फूट – पारंपारिक मतदारसंघ अशी कारणं पुढे करत आता काँग्रेसने या मतदारसंघावर दावा ठोकलाय… रोहित पवार काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सहकार्याने आमदार झाले; मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कायम मित्रपक्षाला दुय्यम वागणूक दिली. कधीच काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले नाही… कर्जत नगराध्यक्षपद, पंचायत समिती सभापतिपद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद यासह इतर पदांवर काँग्रेसला संधी देण्याची गरज होती, मात्र रोहित पवारांनी राष्ट्रवादीलाच जास्तीत जास्त संधी दिली आणि काँग्रेसवर अन्याय केला… काँग्रेसला स्वतंत्र वाटा द्यायची त्यांची मानसिकता नाही, असं म्हणत आता काँग्रेसकडून एडवोकेट. कैलास शेवाळे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटले आहेत… अर्थात ही गोष्ट रोहित पवारांना न परवडणारी आहे… मतदार संघातला आणि आघाडीतला महत्त्वाचा पक्षच आपल्या उमेदवारीला विरोध करत असेल तर मत विभाजनाचा बसणारा फटका आणि सोबतच अजित दादांची खेळी यामुळे रोहित पवारांच्या आमदारकीवर आभाळ येऊ शकतं… बाकी बारामती किंवा हडपसरसाठी रोहितदादा आमदारकीची चाचपणी करत असल्याच्या राजकीय वावड्याही बरच काही सांगून जातात…

उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम राम शिंदे करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी सातत्याने करत असतात. यातून दोघांनी अनेकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. मतदातसंघात येणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी नेहमीच संघर्षाचे केंद्रस्थान राहिले. याचे दोन कारणे असून चौंडी हे राम शिंदे यांचे मूळ वास्तव्याचे गाव असून ते अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत आणि चौंडीचा विकास कोणी केला यावर होत असलेले दावे-प्रतिदावे हे रोहित पवार व राम शिंदे करत असतात.. त्यातून कर्जत जामखेड मध्ये गेली पाच वर्षे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष पहायला मिळाला. त्यामुळे रोहित पवारांना एका बाजूला काँग्रेसने कर्जत जामखेडवर दावा सांगितल्यामुळे झालेली कोंडी व दुसऱ्या बाजूला पारंपारिक विरोधक राम शिंदे यांच्याशी होणारा संघर्ष यामुळे रोहित पवारांना कर्जत जामखेडमध्ये आपला वेळ हा संघर्षातच घालावा लागत आहे.. दुसरीकडे राम शिंदे यांचे पारंपारिक विरोधक असलेले सुजय विखे पाटील या दोघात आता समेट घडून आला आहे. विखे व शिंदे आता एक दिलाने काम करत असल्याने रोहित पवारांचे टेन्शन वाढलं आहे…

.मनीषा गुंड यांचं अजितदादा गटात प्रवेश करणं ही गोष्टही रोहित पवारांना बॅकफुटला घेऊन जाणारी आहे… गुंड यांच्या प्रवेशाने रोहित पवार हे सद्या बॅक फुटवरती फेकले गेलेत.. कारण मनीषा गुंड यांच्यामागे मराठा समाजाचा मोठा पाठिंबा असून, सध्या मनीषा गुंड या राजकीय विरोधक असलेले चुलते अजित पवार यांच्या गटात गेल्याने रोहित पवारांची दुहेरी कोंडी झालीय… थोडक्यात पक्षात फूट पडणं, अजित दादा गट स्ट्रॉंग असणं, मनीषा गुंड यांची विरोधात एन्ट्री, काँग्रेसचा जागेवरचा दावा आणि शिंदे – विखे एक होणं या सगळ्या गोष्टी पाहता रोहित पवारांची कर्जत जामखेडची आमदारकी धोक्यात आहे, एवढं मात्र निश्चित… त्यामुळे आता कर्जत जामखेडचा पुढचा आमदार कोण? या प्रश्नाचा सस्पेन्स थ्रिलर येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच…बाकी तुम्हाला काय वाटतं? कर्जत जामखेड चा पुढचा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…