Wednesday, June 7, 2023

मुख्यमंत्री शिंदेच्या फोननंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट; सीमावादावर म्हणाले,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद चांगलाच पेटला असून काल झालेल्या राड्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ले करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही कर्नाटकातील बसेसना काळे फासण्यात आले. दोन्ही राज्यांतील वाढता तणाव बघता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. दोघांच्यात झालेल्या चर्चेनंतर बसवराज बोम्मई यांनी सूचक असे ट्विट केले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आपण भूमिकेवर ठाम आहोत. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच त्याबद्दल कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जाईल, असे बोम्मई यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. महाराष्ट्रातील बसेसला कर्नाटकात जाणीवपूर्व लक्ष केले जात असल्याचे फडणवीसांनी म्हटले होते. दुसरीकडे विरोधकांनी यावर आक्रमक भूमिका घेत सीमाप्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. रे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ४८तासांचा अल्टिमेटम बोम्मई यांना दिला आहे.

४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असा इशारा पवारांनी काल दिला. त्याला प्रत्युत्तर देताना 48 तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नसल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही राज्यांमधील वाढता वाद पाहता, मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.