भारतातील ‘या’ तीर्थस्थानावर रील-व्हिडिओ बनवणे पडणार महागात ! दर्शन तर सोडाच , दाखवली जाणार घरची वाट

kedarnath
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतात तीर्थस्थानांना मोठे महत्व आहे. केवळ देशातूनच नाही तर परदेशातून सुद्धा लोक या तीर्थ स्थानांवर दर्शन घेण्यासाठी येत असतात.
अशातच भारतातील प्रसिद्ध तीर्थस्थानाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या तीर्थस्थानावर रील-व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

उत्तराखंडमधील गढवाल हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये वसलेले केदारनाथ मंदिर 2 मे 2025 पासून भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. चारधाम यात्रेतील एक पवित्र तीर्थस्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात यंदा नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये मंदिराच्या परिसरात रील्स आणि व्हिडिओ बनवण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना दर्शन नाकारले जाईल आणि त्यांना परत पाठवले जाईल.

मंदिर परिसरात मोबाईल आणि कॅमेरा बंदी

गेल्या वर्षी केदारनाथ मंदिरात अनेक भाविकांनी व्हिडिओ आणि रील्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले. यामुळे मंदिराच्या पवित्रतेवर परिणाम झाल्याचे दिसून आल्याचे यथील तीर्थक्षेत्राचे म्हणणे आहे. त्यामुळे या वर्षी मंदिराच्या 30 मीटर परिसरात मोबाईल आणि कॅमेरा पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

रील्स किंवा व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कडक कारवाई

केदारनाथ-बद्रीनाथ पंडा समाजाने स्पष्ट केले आहे की, जर कोणी भाविक व्हिडिओ किंवा सोशल मीडिया रील बनवताना आढळला, तर त्याला दर्शनास मज्जाव करण्यात येईल आणि त्याला त्वरित परत पाठवले जाईल. मंदिर प्रशासनाच्या नव्या नियमानुसार भाविकांना मंदिराच्या आत मोबाईल किंवा कोणतेही डिजिटल गॅझेट नेण्यास मनाई असेल.

नियम का करण्यात आला कठोर?

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थपलियाल यांनी सांगितले की, मंदिराची पवित्रता आणि भक्तीमय वातावरण अबाधित राखणे ही प्राथमिकता आहे. त्यामुळे यावर्षीपासून मंदिर परिसरात कोणत्याही भाविकाला मोबाईल किंवा कॅमेरा नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मंदिर समितीने स्पष्ट केले आहे की पोलिस, ITBP जवान आणि मंदिराचे कर्मचारी भाविकांवर सतत नजर ठेवतील. जर कोणी हे नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

भाविकांनी नियमांचे पालन करावे

भाविकांनी या नव्या नियमांचे पालन करावे, जेणेकरून दर्शन निर्विघ्नपणे होईल आणि मंदिराच्या शुद्धतेला कोणताही धक्का बसणार नाही. केदारनाथ धामच्या पवित्रतेचे आणि भक्तीमय वातावरणाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे केदारनाथला जाण्याच्या तयारीत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा आणि त्यांचे पालन करा.

केदारनाथचे महत्त्व

केदारनाथ मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे 1,968 फूट उंचीवर वसलेले आहे. केदारनाथ मंदिर भगवान शंकराला समर्पित असून, हे मंदीर पांडवांनी महाभारताच्या काळात बांधल्याची मान्यता आहे. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये मोठा पूर आणि भूस्खलन झाल्यानंतरही हे मंदिर टिकून राहिले होते, त्यामुळे त्याची आध्यात्मिक महत्ता आणखी वाढली आहे.