Kej Vidhan Sabha : केजमध्ये नमिता मुंदडा- संगीता ठोंबरे यांच्या भांडणात साठे आमदार होतायत?

Kej Vidhan Sabha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये बजरंग बाप्पा जायंट किलर ठरले… पंकजाताईंना पराभवाचा धक्का बसला… कमळावर तुतारी भारी पडली… आता हाच सिलसिला विधानसभेलाही पाहायला मिळेल… जिल्ह्यात अनेक विधानसभेत कमळ विरुद्ध तुतारी अशा संघर्षाला निवडणूक जाहीर होण्याच्या आधी तोंड फुटलेलं असताना दुसऱ्या बाजूला केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप असाच काहीसा संघर्ष अद्याप तरी दिसतोय… असं म्हणण्याचं कारण म्हणजे केजच्या भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात भाजपमधीलच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दंड थोपटले असून काहीही झालं तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय… अर्थात पक्षाने तिकीट नाकारलं तरी वेगळी वाट धरली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी मीडियाच्या माध्यमातून आधीच दिलाय… त्यामुळे मुंदडा विरुद्ध ठोंबरे यांच्यात उमेदवारीवरून सुरू झालेल्या घमासनाचा फायदा उचलत पृथ्वीराज साठे इथून आमदारकीचा हाबाडा करण्याचे जास्त चान्सेस आहेत… त्यामुळे केजमध्ये भाजप उमेदवारी कुणाला देतय? केज मध्ये यंदाही आमदारकीला महिलाराजच चालेल? की बजरंग बाप्पांच्या पावलावर पाय ठेवून पृथ्वीराज साठे मतदारसंघातून जोरदार तुतारी वाजवतायत? याच सगळ्या प्रश्नांची उत्तर सांगताना केजचा पुढचा आमदार कोण होतोय? ते जाणून घेऊया …

1962 पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तेरा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी चार वेळा तर अपक्षाने एक वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली… पण इथं खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवलं ते विमल मुंदडा यांनी… 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस करून सलग पाच वेळा निवडून गेल्या… तब्बल दहा वर्ष विविध खात्यांचा मंत्रिपदाचा अनुभव त्यांनी केजच्या विकासाच्या कामी लावला… अपर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि भूमी अधिग्रहण कार्यालयांच्या टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधल्या… आरोग्य मंत्री असताना तर त्यांनी राज्यातील पहिलं महिला रुग्णालय केजमध्ये आणलं… पाणी प्रश्नापासून ते तालुक्याला जिल्हा बनवण्यासाठी विमल मुंदडा यांच्या कामाला नाकारून चालणार नाही….

पण 2012 ला कॅन्सरच्या दुर्धर आजारात विमल मुंदडा यांचे दुर्दैवी निधन झालं… मुंदडा यांच्या निधनानंतर केज विधानसभेत पोटनिवडणूक लागली… तेव्हा राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून संगीता ठोंबरे निवडणूक रिंगणात होत्या… मात्र सहानुभूती राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याने पृथ्वीराज साठे इथून निवडून आले… पण आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी पोटनिवडणूक असतानाही आपल्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल 77 हजार मतं घेत राष्ट्रवादीला मोठा झटका दिला…अर्थात याचे पडसाद 2014 च्या विधानसभेला उमटलेच… राष्ट्रवादीने यावेळेस पृथ्वीराज साठेंना होल्डला ठेवून मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांना निवडणूक रिंगणात उतरवलं… पण मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्ववादी राजकारणाला शह देत 2014 ला पहिल्यांदाच भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार झाल्या…. 2019 ला मात्र केज विधानसभेत मोठी उलथा पालथं झाली… दस्तूर खुद्द शरद पवार यांनी केज विधानसभेची 2019 ची उमेदवारी नमिता मुंदडा यांना जाहीर केली… पण मुंदडा यांच्या डोक्यात काही वेगळंच होतं… पक्षांतर्गत चढाओढ आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे आपलं काम करणार नाही, असा अंदाज घेऊन मुंदडा यांनी हातातील घड्याळ सैल करत पंकजाताईंच्या हातून कमळ घेत भाजपची उमेदवारी मिळवली… राष्ट्रवादीने ही आयत्या टाइमिंगला पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देत केजची निवडणूक प्रतिष्ठेची केली… पण अखेर मुंदडा कुटुंबाचा वारसा पुढे चालवत अखेर नमिता मुंदडा आमदार झाल्या… पण यावेळेस मतदारसंघातला राष्ट्रवादीचा सूर्य मावळला तो कायमचाच…

कट टू 2024. केज विधानसभेतून बजरंग बाप्पांच्या बाजूने लीड आल्याने नमिता मुंदडा यांची आमदारकी धोक्यात आहे, ते तर कन्फर्म दिसतंय… त्यातही 2019 ला पक्षाने शब्द दिला म्हणून शांत बसले… पण आता काहीही झालं तरी आमदारकी लढणारच, असं म्हणत संगीता ठोंबरे हट्टाला पेटल्याने भाजप समोर कोणाला तिकीट द्यायचं? हा मोठा प्रश्न असणार आहे… त्यात नमिता मुंदडा या उच्चशिक्षित आहेत.. तरुण आहेत… आपल्या चिमुकल्या तीन महिन्याच्या मुलाला घेऊन विधानसभेतला त्यांचा फोटोही बराच व्हायरल झाला होता… पण असं असलं तरी त्यांचा मतदारसंघातील कनेक्ट पुरता तुटल्याचं बोललं जातं… त्यात मतदारसंघातील प्रश्न, समस्या आणि जनसंपर्काच्या बाबतीतही मुंदडा यामागे आहेत, असं स्थानिक लोक सांगतात…

त्यामुळे नमिता मुंदडा की संगीता ठोंबरे? यांपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं? यावरून केजमध्ये भाजपची चांगलीच अडचण होऊ शकते… त्यात विधानसभेला तुतारीला मिळालेलं लीड पाहता लोकसभेचा निकाल विधानसभेलाही कायम राहिला तर पृथ्वीराज साठे यांना तुतारी वाजवून आमदारकीचा हाबाडा करण्याचे फुल टू चान्सेस आहेत…केज विधानसभा मतदारसंघांमध्ये वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असतं… जवळपास 80 हजार मतदान हे वंजारी समाजाचे तर एक लाखांपेक्षाही जास्त मतदान हे मराठा समाजाचे आहे. त्या खालोखाल 45 हजार मतदान हे मुस्लीम यासोबतच 50 हजार मतदान हे ओबीसी करतात… थोडक्यात ओबीसी – वंजारी आणि मराठा – मुस्लिम – दलित यांची एकगठ्ठा मतं कुठल्या बाजूने झुकणार? यावरही केज विधानसभेचा निकाल कुठल्या बाजूने लागणार? हे स्पष्ट सांगता येईल…

भाजपमध्ये मुंदडा यांच्या ऐवजी पक्षातील पदाधिकारी आणि मतदार ठोंबरे यांच्या नावाची मागणी करतायत… त्यामुळे ठोंबरे आल्या तर अटीतटीची लढत केजमध्ये पाहायला मिळू शकते… त्यामुळे हा सगळा राजकीय सारीपाट पाहिला तर केजमध्ये पृथ्वीराज साठे यांच्यासाठी घोडे मैदान थोडं सोपं असल्याचं सांगता येऊ शकतं… बाकी तुम्हाला काय वाटतं? केजचा पुढचा आमदार कोण? नमिता मुंदडा – संगीता ठोंबरे की पृथ्वीराज साठे, तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.