विश्वभूषण करूणा महेश लिमये
तुफानातले दिवे व्हारे…
कवी वामन दादा कर्डकांनी म्हटल्याप्रमाणे इथं आलेला प्रत्येक स्वयंसेवक झपाटल्यागत आपआपलं काम पार पाडत असताना दिसला, मग त्यामध्ये लहाणांपासून वृध्दांपर्यंत,
स्त्रियांपासून पुरूषांपर्यंत प्रत्येकजण या तुफानात दिव्याप्रमाणे जळतो आहे आणि आपल्या प्रकाशाचा
उजेड होता होईल तितक्यांपर्यंत पोंहचवण्याचा प्रयत्न करतो आहे.
CYDA ची टिम सुध्दा त्यापासून कांही वेगळी नाही,
कारण संत गाडगेबाबांच्या पुण्यभूमी महाराष्ट्रातून आलेले आम्ही आगोदरपासूनच स्वच्छताप्रिय असणाऱ्या केरळमध्ये स्वच्छता या विषयावर काम करत असताना भरपूर नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.
जवळपास आज कामाचा ९ वा दिवस आहे आणि आमच्या टिमने आतापर्यंत ३४ घरांची स्वच्छता केली आहे. केरळ पुराचा फटका येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला कारण यामुळे जवळपास १० दिवस सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती,
त्यामुळे ते सर्व पूर्वपदावर आणण्यासाठी शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये यांची स्वच्छता आम्हाला महत्वाची वाटली म्हणून आम्ही त्यावर भर दिला.
इथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडू नये म्हणून सार्वजनिक आरोग्यकेंद्रावर आम्ही काम केलं. त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालयांची स्वच्छता हा पण महत्त्वाचा मुद्दा होता. आमच्या पूर्ण टिममध्ये लोकपंचायत आयटीआय कॉलेज संगमनेरहून ६ विद्यार्थी इलेक्ट्रिशियन,प्लंबर या तांत्रिक गोष्टींवर काम करण्यासाठी होते. त्याचबरोबर त्यांचे उपप्राचार्य बाळासाहेब हासे सर या विद्यार्थ्यांबरोबर काम करत आहेत. खास नागपूरहून सर्पमित्र करण द्विवेदी आला आहे. त्याला स्वच्छतेदरम्यान २-३ किंग कोब्रा जमातीचे साप सापडले त्यांना परत सोडून देण्यात आले. एमएमसीसी महाविद्यालय पत्रकारितेचा विद्यार्थी महेश जगताप, CYDA टिमचे सेक्रेटरी मॕथ्यू मट्टम हे मूळचे केरळचेच पण सध्या पुणेकर झालेले आमच्या संपूर्ण टिमच नेतृत्व करत होते. त्याचबरोबर अकोलेवरून आलेला विकास म्हस्के, मध्यप्रदेशहून आलेले कल्पेश पांडे प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. काहीपण करून केरळ पुन्हा नव्याने सुरू करणे हेच ध्येय इथ काम करणाऱ्या प्रत्येकाच आहे. केरळ राज्यात १४ जिल्हे आहेत, त्यातील १३ जिल्हे या पूरामुळे पाण्याखाली आले. त्यामुळे याचा भयंकर फटका केरळला बसला आहे.
यातून आता केरळच्या नव्याने उभारणीसाठी पावले उचलली जातं आहेत. “देव भूमी” म्हणून ओळख आसणारा केरळ आज माणसं उभा करत आहेत. या पूर्ण काळात गरीब,श्रीमंत,उच्च,नीच,श्रेष्ठ,कनिष्ठ असा कुठलाच भेद इथे दिसला नाही.
आमचा सकाळचा नाष्टा मंदीरात,
दुपारच जेवण मशीदित
आणि रात्रीची झोप ही चर्चमध्ये होत आहे,
याहून वेगळं आणि काय पाहिजे विविधतेमध्ये एकता,
इथच आपण सर्व एक आहोत हे सिध्द होऊन जातं…
केरळमध्ये मागील १०-१२ दिवसांमध्ये ३-४ जिल्हांमध्ये(कोट्टयम,कोट्टनाड,आलप्पी,इ.) काम करता आलं याच समाधान आहे.
याचा अर्थ काम संपलय असे नाही,
ही तर आता सुरूवात आहे….
आरंभ है प्रचंड….