आव्हाड अटक प्रकरणात केतकी चितळेची उडी; केले गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असतानाच या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेने देखील उडी घेतलीय. जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेली कलमं पुरेशी नाहीत, त्यांच्यावर कलम ३५४ ,१२० कलम लावा अशी मागणी केतकीनं तिच्या वकिलांमार्फक केली आहे.

आव्हाडांवर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नाहीत . त्यांना जी कलमं लावण्यात आली आहेत ती लगेच जामीन मिळतील अशी आहेत. तरुणाला मारहाण हा मुद्दा तर आहेच, पण त्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याचा दावा या नोटीशीमध्ये चितळे यांनी केला आहे. त्यानुसार विनयभंगाचे कलम 354 नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी तीने केली आहे.

हे सगळं प्लॅनिंग करुन सर्व केलं आहे यामुळे कलम १२० ब देखील लावावे अशी मागणी केतकीने केली आहे. अन्यथा आम्ही हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टाकडून ऑर्डर आणून ही कलमे वाढवायला लावू असे केतकी चितळेकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, शरद पवारांवर टीका करणाऱ्या केतकीने आता आव्हाड यांच्या अटक प्रकरणात देखील उडी घेतल्याने पुन्हा एकदा केतकी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.