जर तुम्ही मुंबई पुणे असा प्रवास हायवे वरून केला असेल तर तुम्हाला नक्की आठवत असेल तो खंडाळा घाट मात्र आता ह्या खंडाळा घाटामध्ये वारंवार ट्राफिक जामची समस्या उद्भवते. या मार्गावरील ट्रॅफिक जॅम ची समस्या आता वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण या एक्सप्रेस वे वरून मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरच्या महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत सह्याद्रीच्या डोंगरात केबल स्टेड पूल उभारला जात आहे त्यामुळे एक्सप्रेसवे मार्गे मुंबई पुण्याचा प्रवास आणखी जलद आणि विना कोंडीचा होणार आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात
या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुंबई पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरील मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यामध्ये आला आहे. या प्रकल्प अंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या खंडाळा घाटात 180 m उंच स्टेड पूल उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम 90% पूर्ण झालं असून 2025 या वर्षात हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आहे या प्रकल्पामुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर सहा किलोमीटर ने कमी होणार असून यामुळे प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही
14 किलोमीटर चा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. फक्त लोणावळ्यात प्रवेश करण्यासाठी या खंडाळा घाटातून जावे लागेल. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. डिसेंबर 2024 हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, नियोजीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. यामुळे आता हा प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. यामुळे 2025 मध्ये प्रत्यक्षात कधी हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.