असल्या नालायक मंत्र्यांना मराठा समाज धडा शिकवेल; पेडणेकरांचा तानाजी सावंतांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेतला. असल्या नालायक मंत्र्यांना मराठा समाज धडा शिकवेल असं म्हणत त्यांनी जोरदार घणाघात केला आहे. त्या मुंबईत प्रसामाध्यमांशी बोलत होत्या.

पेडणेकर म्हणाल्या, मी सुद्धा मराठा घराण्यातील, मराठा खानदानातील आहे. असल्या नालायक, बेवर्तन करणाऱ्या मंत्री महोदयांना त्यांनी जी भाषा वापरली त्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल, विरोधात असताना मराठा समाजावरून तुम्हाला कोंब फुटत होते. तेव्हा तुम्ही नाटक केली आता तुम्ही सत्तेत आहात ना… द्या ना मग आरक्षण, आता का मागे हटताय… मराठा समाजाबद्दल वाईट बोलताय तुम्ही?? मराठा समाज तुम्हाला नक्की धडा शिकवेल असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी तानाजी सावंत यांचा समाचार घेतला.

तानाजी सावंत यांच्या या विधानानंतर काँग्रेसही आक्रमक झाली आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून त्यावर सरकारने खुलासा केला पाहिजे, तसेच सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, सर्वच स्तरावरून चौफेर टीका झाल्यानंतर अखेर तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे. मी मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. राहिला विषय माफीचा तर, ज्या समाजामुळे मी कॉलर ताठ करून फिरतो त्या समाजाची माफी मला लाज वाटत नाही. माझं वक्तव्य मराठा समजला खटकलं असेल ते एकदा नाही तर एक लाख वेळा माफी मागेन, पाळण्यातील लहान बाळापासून ते ९० वर्षाच्या आजोबापर्यंत मी सर्वांची माफी मागतो असे तानाजी सावंत यांनी म्हंटल.