देशभरामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यातही छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडून उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. देशातील मोठी शहरे जसे की मुंबई, दिल्ली, बेंगलोर अशा शहरांना छोटी शहरे जोडण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच आता कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे. कारण कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटी मध्ये वाढ होणार असून लवकरच कोल्हापूर – दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरु होणार आहे. याबाबतची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरु होणार आहे. या मार्गावर इंडिगो कंपनीची विमानं धावतील. या विमानांची आसन क्षमता जवळपास १८० इतकी असेल.
कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव हा भारतीय विमान प्राधिकरण महासंचालकांच्याकडे अंतिम टप्प्यात असून लवकरच याला मान्यता मिळणार असल्याची माहिती धनंजय महाडिक यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.
काय असेल वेळ ?
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 10:10 मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाल करेल आणि दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर 1:25 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून इंडिगो विमानाचे उड्डाण होईल आणि सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी ते दिल्लीला पोहोचेल.
पर्यटनाला चालना
दरम्यान ही सेवा सुरु झाल्यास अनेकांना याचा फायदा होणार आहे. कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून याठिकाणी देश विदेशातून पर्यटक येत असतात. ही विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटकांचा ओघ कोल्हापुरात वाढण्याची आशा आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच उद्योग धंद्यानिमित्त कोल्हापुरातून थेट दिल्ली प्रवास करणाऱ्यांसाठी सुद्धा ही सेवा सोयीची होणार आहे. कारण बाय रोड किंवा ट्रेनच्या साहाय्याने प्रवास केल्यास प्रवाशांचा खूप वेळ खर्च होतो. थेट विमानसेवा सुरु झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.