Kolhapur Lok Sabha 2024 : शाहू महाराजांच्या एन्ट्रीमुळे कोल्हापुरात ‘मविआ’चे पारडं जड?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर…छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा…सोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी…शिक्षणापासून ते शेतीपर्यंत…आणि उद्योगधंद्यांपासून ते राजकारणापर्यंत हा जिल्हा पाणीदार समजला जातो…कोल्हापुरी रस्सा आणि कोल्हापुरी भाषेचा स्वतःचा असा एक आगळावेगळा ठसा आहे…तसंच इथलं राजकारणही भल्याभल्यांची दमछाक करणार तरीही आपल्या सुसंस्कृतपणासाठी राज्यभरात ओळखलं जाणार असं आहे…इतिहास पाहायचा झाला तर या मतदारसंघाला नेहमीच पुरोगामी विचारांची किनार लागली. त्यामुळे 1951 पासूनच काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार या जागेवरून डोळेझाकपणे निवडून आले. शेवट शेवट तर हा राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला बनला. अगदी 2014 च्या मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक कोल्हापुरातून मोठ्या फरकानं विजयी झाले.

2019 ला ही जागा संजय मंडलिक यांच्या रूपाने शिवसेनेला मिळाली, मात्र त्यांच्या विजयात काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा मोठा हातभार होता. एकंदरीत कोल्हापूरवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा हा कायम असल्याचा पाहायला मिळालय. मात्र हसन मुश्रीफ, ए. वाय पाटील, धनंजय महाडिक यांसारखे एक से बढकर एक मातब्बर नेते महायुतीच्या वळचणीला असल्याने आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटासोबत असल्याने मतदारसंघात महायुतीची ताकद भलतीच वाढली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या या पाणीदार मतदारसंघावर अनेक वर्षांपासून राजकीय वर्चस्व गाजवण्याची सुप्त इच्छा असणाऱ्या भाजपाला यंदा कोल्हापूर मधून लोकसभेची उमेदवारी मिळणार का? पॉलिटिकल बेस मजबूत असल्याने आणि कार्यकर्त्यांची तगडी फळी असल्याने कोल्हापूरच्या राजकारणात प्लस वन मध्येच असणाऱ्या महाविकास आघाडीचा या मतदारसंघातील उमेदवार शाहू महाराज (Shahu Maharaj) हेच असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कोल्हापूरची जागा (Kolhapur Lok Sabha Election) जिंकणार का? याकडे पश्चिम महाराष्टचे लक्ष्य आहे.

Kolhapur Loksabha : शाहू महाराजांच्या एन्ट्रीमुळं काटाकिर्रर्र, Sharad Pawar यांचा मास्टरस्ट्रोक

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच कोल्हापूरकरांनी शरद पवारांच्या उमेदवाराला डोळेझाकपणे निवडून दिलं. 1999 पासून 2009 पर्यंत एनसीपीच्या तिकिटावर देवराव मंडलिक यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं. मात्र 2009 च्या वेळेस अपक्ष उभे राहत मंडलिक यांनी खासदारकी पुन्हा कायम ठेवली. मात्र 2014 मध्ये मोदींची सर्वात मोठी राजकीय लाट आलेली असताना देखील धनंजय महाडिक यांच्या रूपाने राष्ट्रवादीने कोल्हापूरकरांचा विश्वास कायम ठेवत मतदारसंघावरची आपली पकड आणखीन मजबूत केली. मात्र नेहमीच एकतर्फी आणि सुटसुटीत होणाऱ्या कोल्हापूरच्या निवडणुकीला 2019 मध्ये अनपेक्षित वळण लागलं आणि त्याला कारण ठरलं ते म्हणजे बंटी आणि मुन्ना यांच्यातील संघर्ष!

खर तर 2019 मध्ये आघाडीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच राष्ट्रवादीकडून तिकीट देऊ करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्याने प्रा. संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात होते. म्हणजे ही लढत सरळ सरळ महाडिक विरुद्ध मंडलिक असली तरी या लढतीत अनेकांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना उघड-उघड आपला पाठिंबा दर्शवला. एवढंच नाही तर छुप्या पद्धतीनं सगळी यंत्रणा मंडलिक यांच्या बाजूनं उभा केली. शिवसेनेच्या इतिहासात या मतदारसंघात कधीच सेनेचा खासदार याठिकाणाहून निवडून आला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की एक वेळ तरी कोल्हापूरमधून शिवसेनेचा खासदार संसदेत गेला पाहिजे. शेवटी शिवसेनाप्रमुखांची ही इच्छा पूर्ण झाली. भाजप आणि शिवसेनेचा तळागाळातील प्रचार आणि जिल्ह्याच्या राजकारणावर कंट्रोल असणाऱ्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी बॅक सपोर्ट केल्यानं बंटी विरुद्ध मुन्ना या संघर्षात सतेज पाटील वरचढ ठरले आणि धनंजय महाडिक यांचा पराभव होऊन संजय मंडलिक यांच्या रूपाने कोल्हापुरातला पहिला वहिला शिवसेनेचा खासदार दिल्लीत गेला.

मात्र 2024 च्या सुरुवातीला लोकसभेच्या नव्या पर्वाची सुरुवात झालेली असताना राजकारणात घडलेल्या पक्ष फुटीच्या आणि गटातटांच्या राजकारणामुळे कोल्हापूरच्या आधीच तिखट वातावरणात आणखीनच झणका मारला आहे. 2019 नंतर तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि सर्वच्या सर्व आमदार महाविकास आघाडीकडेच असल्याने भाजप मतदार संघातून बॅक फुटला गेली होती. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी नवा डाव टाकून धनंजय महाडिकांना राज्यसभा मिळवून दिली. यानंतर मंडलिक शिंदे गटात गेल्याने आणि मतदार संघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अजित दादांसोबत आल्याने महायुतीची म्हणजेच एक अर्थाने भाजपची कोल्हापुरातील ताकद चांगलीच वाढली आहे. त्यात संजय मंडलिक सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर जाण्यासाठी सगळी तयारी करून बसलेले असताना भाजपलाही कोल्हापूरच्या लाल मातीचा मोह काही सुटलेला दिसत नाहीये. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये कोल्हापुरात मंडलिक यांना फटका बसत असल्याचं दिसत असल्याने भाजपचा उमेदवार पुढे करण्यासाठीची हालचाल केली आहे. त्यात महाडिक कुटुंबाकडून पक्षाने जर विश्वास टाकला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौमिका महाडिक यांची नावे निवडणुकीसाठी चर्चेत आली आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचही नाव समोर केलं जातंय. त्यामुळे युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा काही प्रमाणात का होईना सुटसुटीत वाटत असताना तितकाच तो गुंतगुंतीचा बनलेला आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) शाहू महाराज यांची उमेदवारी ठरली आहे. शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक असल्याने हि जाग ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात येईल आणि त्याबदल्यात सांगलीची काँग्रेसची जागा ठाकरे गटाला मिळेल अशा चर्चा आहेत. शाहू महाराज यांच्या प्रचारापासून ते विजयापर्यंत संपूर्ण जबाबदारी काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या खांद्यावर असेल. शाहू महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज हे सुद्धा कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक होते, परंतु आपल्या वडिलांसाठी आपण निवडणूक लढवणार नाही, तसेच शाहू महाराज सांगतील तीच आपली भूमिका राहील असं म्हणत संभाजीराजे यांनी आपली भूमिक स्पष्ट केली आहे. संभाजीराजेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला आणखी बळ मिळाले आहे.