हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहुन गोव्याला जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र त्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा एकच पर्याय आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे, त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि खराब रस्त्यामुळे मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १२-१२ तास गाडीत बसावं लागतंय. यावर उपाय करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी सरकार कोकण एक्स्प्रेसवे (Konkan Expressway) हा पर्यायी मार्ग बनवत आहे. कोकण एक्सप्रेस वे साठी डीपीआर बनवण्याचे काम जवळपास पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत असून या नव्या महामार्गामुळे मुंबई गोवा दरम्यानचा प्रवास १२-१३ तासांवरून केवळ ६ तासांवर येईल.
17 तालुक्यामधून जाणार महामार्ग – Konkan Expressway
कोकण एक्सप्रेस वे हा सुमारे 376 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल. 6 लेन रुंदीचा हा महामार्ग 17 तालुक्यामधून जाणार आहे. संपूर्ण मार्गावर 14 इंटरचेंज असणार आहेत. कोकण एक्सप्रेसवे हा मुंबईला सिंधुदुर्गला जोडेल. या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या क्षेत्राच्या आर्थिक विकासात देखील वाढ होईल तसेच दोन्ही ठिकाणच्या पर्यटनालाही चालना मिळेल. सध्या मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर कापण्यासाठी १२-१३ तासांचा वेळ लागत आहे, मात्र नव्या कोकण एक्सप्रेसमुळे अवघ्या ६ तासांत तुम्ही मुंबईतून कोकणात जाऊ शकणार आहात.
हा द्रुतगती मार्ग पनवेल (नवी मुंबई) ते रायगड आणि रत्नागिरीमार्गे सिंधुदुर्गला जाणार असून, या प्रकल्पासाठी 68 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोकण एक्स्प्रेसवे (Konkan Expressway) प्रकल्पासाठी सुमारे 3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे. कोकण एक्सप्रेसवरून प्रवास करताना अनेक डोंगर आणि नदी नाले पार करावे लागतील. तसेच निसर्गाचा देखावा प्रवाशांना अनुभवता येणार आहे. एकीकडे मुंबई- गोवा महामार्गाचे काम कासव गतीने सुरु असताना दुसरीकडे या कोकण एक्सप्रेसमुळे मुंबईकरांना आणि कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.