Koyna Dam : कोयनेची वीजनिर्मिती बंद; धरणक्षेत्रात दिवसभर मुसळधार पाऊस सुरुच, पाणीपातळी किती वाढली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. असे असताना कोयना विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती (Koyna dam electric power generation) बंद करण्यात आली आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी वशिष्ठी नदीला जाऊन चिपळूणला पुराचा धोका आणखी वाढू शकतो, म्हणून वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली आहे.

वशिष्ठी नदी दुथडी

चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. वशिष्ठी नदी व शिव नदी दुथडी भरुन वाहत आहेत. मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वशिष्ठी नदीचे पाणी धोका पातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे चिपळूणला पुराचा धोका संभवत आहे.

वीजनिर्मिती होऊन पाणी जाते वशिष्ठीला

सिंचन आणि पिण्यासाठी पुर्वेकडे पाणी सोडताना पायथा वीजगृहात वीजनिर्मिती करून ते कोयना नदीपात्रात सोडले जाते. त्याच प्रमाणे १ ते ४ या टप्प्यांमध्ये वीजनिर्मितीनंतर वाहून जाणारे पाणी चिपळूणच्या वशिष्ठी नदीला जाऊन मिळते. सध्या वशिष्ठी नदी धोका पातळीपर्यंत वाहत आहे. त्यात कोयनेच्या वीजनिर्मितीचे पाणी सोडल्यास पुराचा धोका वाढू शकतो. म्हणूनच कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली आहे.

नऊ तासात ४२९ मिलीमीटर पाऊस

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या दरम्यान कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या ठिकाणी ४२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयनेत सर्वाधिक १६५ मिलीमीटर, महाबळेश्वरात १५३ आणि नवजामध्ये १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाणीसाठ्यात तीन टीएमसीने वाढ

कोयना धरणात बुधवारी सकाळी ८ वाजता ३१.१० टीएमसी इतका पाणीसाठा होता. दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या नऊ तासात पाणीसाठा तीन टीएमसीने वाढला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ३४.३ टीएमसी झाला असून धरणात प्रतिसेकंद ६६ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाटण तालुक्यातील छोटे पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Koyna Dam
Date: 19/07/2023
Time: 05:00 PM
Water level: 2083′ 10″ (635.152m)

Dam Storage:
Gross: 34.03 TMC ( 32.33%)

Inflow: 66159 cusecs

Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna: 165/1472
Navaja: 111/2075
Mahabaleshwar: 153/2051