हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण असलेल्या कोयना धरणाची वाटचाल खाजगीकरणा कडे सुरू आहे की अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण महानिर्मितीकडे 35 वर्षांपूर्वी हस्तांतरीत प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केला जाणार आहे. त्यानुसार कोयना तिसरा टप्पा आणि कोयना पाचवा टप्पा पुन्हा जलसंपदा विभागाकडे जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यात जलविद्युत प्रकल्पांची उभारणी जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फत करण्यात येते. प्रचलित कार्यनियमावली नुसार हे प्रकल्प उभारणीनंतर भाडेपट्टी तत्वावर परिचलन व देखभालीसाठी महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात येतात. यानुसार २५९२.२७ स्थापित क्षमता असलेले २७ जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे ३५ वर्षाकरिता भाडेपट्टीने हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत.
बीओटी तत्त्वानुसार प्रकल्पांचे नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि त्यानंतर परिचालन करण्यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. या साऱ्या प्रक्रियेमुळे या प्रकल्पाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळतायत. राज्यातील आणखी चार जलविद्युत प्रकल्पदेखील जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केले जातायत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या कोयना धरणाची निर्मिती 1963 मध्ये झाली. हे धरण सातारा शहरापासून 98 किमी अंतरावर आहे, तर पाटण शहरापासून 20 किमीवर आहे. या धरणाची क्षमता 98.78 टीएमसी असून, जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 1920 मेगावॉट इतकी आहे. कोयना धरणातून प्रतिदिनी सरासरी केवळ 0.19 अब्जघनफूट प्रतिदिन एवढं पाणी पूर्ण वर्षभर पश्चिमेकडे वळवून वीजनिर्मिती होते.