हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कुणाल कामरा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले होते. मात्र, तो हजर राहू शकला नाही, त्यामुळे कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने आपल्या स्टँडअप शोमध्ये एक विडंबनात्मक गाणे सादर केले. या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याचा आरोप आहे. शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी या गाण्याच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे गाणे उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी होते आणि ते समाजात गैरसमज पसरवू शकते.
या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी कुणाल कामरावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्याला चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र, कुणालने वेळ वाढवून मागितली होती. पोलिसांनी त्याची ही मागणी फेटाळल्यानंतर त्याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याच्या वकिलांनी ई-फायलिंगद्वारे याचिका दाखल केली.
त्यानंतर शुक्रवारी न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या समोर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली. कामराच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “माझ्यावर लावलेल्या गुन्ह्यांमध्ये मी निर्दोष आहे आणि तक्रारदाराने केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार वापरल्याबद्दल कलाकाराला त्रास देण्यासाठी आणि धमकावण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीद्वारे मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे,”
इतकेच नव्हे तर, “माझ्यावर लावलेल्या गुन्ह्यांमध्ये मी निर्दोष आहे आणि तक्रारदाराने केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार वापरल्याबद्दल कलाकाराला त्रास देण्यासाठी आणि धमकावण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीद्वारे मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे,” असे कुणाल कामराने आपल्या याचिकेत म्हणले आहे.
त्याचबरोबर, “मला आणि माझ्या जवळच्यांना जीवाला धोका पोहोचवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे ३१ मार्च रोजी मुंबईला गेल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होईल याची भीती वाटत आहे. मी म्हटंलेल्या गाण्यात कोणाचेही नाव घेतलेलं नाही,” असे देखील त्याने नमूद केले आहे. त्यामुळे यावर आता न्यायालयाचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




