लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर देखरेख केली जात आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचे वय सध्या ९६ वर्ष असून एम्स येथील खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. युरॉलॉजी अर्थात मूत्रविकारासंबंधी आजारांवर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना नेमका कसला त्रास होत आहे, याविषयी माहिती मिळालेली नाही. अडवाणी यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, याच वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच, भारतरत्न प्रदान केला होता. अडवाणींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची (आता पाकिस्तानात) येथे झाला. १९४२ मध्ये अडवाणींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. अल्पावधीतच ते भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व ठरले. प्रतिकूल काळात त्यांनी संपूर्ण देशभरात भाजपचा प्रचार प्रसार केला.