हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत सहा हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत. परंतु सातवा हप्ता जमा होण्यापूर्वीच या योजनेबाबत एक मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
लाडकी बहिण योजनेशी संबंधित निकषांचे पालन न करणाऱ्या लाभार्थी महिलांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठा प्रस्ताव मांडला आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की, ” या योजनेचा मुख्य उद्देश गरीब महिलांना आर्थिक मदत देण्याचा आहे. मात्र, ज्या महिलांनी निकषांचे उल्लंघन केले आहे, त्यांनी स्वतःहून आपली नावे योजन्यातून वगळावी. जर त्यांनी असे केले नाही, तर त्यांच्याकडून दंडासह आधी मिळालेले पैसे परत वसूल करण्यात यावेत.”
महत्वाचे म्हणजे, या योजनेतील अपात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. उत्पन्नाचा निकष पूर्ण न करणाऱ्या, चारचाकी गाडी असलेल्या किंवा आधार कार्ड आणि बँक खात्यात वेगळ्या नावाच्या तक्रारी आलेल्या महिलांच्या प्रकरणांवर विशेष लक्ष दिले जाईल, असे यापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे याचा लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला होता. आता भुजबळ यांनी ठेवलेल्या प्रस्तावामुळे महिलांना आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.