हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणूका झाल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती मिळालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये थोडा विलंब झाला होता, पण राज्य सरकारने नवीन जबाबदारी स्वीकारली असून , या स्थगित अर्जाची छाननी पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे योजनेला किती महिला पात्र तसेच अपात्र आहेत, याची पडताळणी केली जात आहे.
पुण्यातील पात्र तसेच अपात्र अर्ज
पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर झाले असून बाकी अर्जांची छाननी सुरू आहे. तसेच आतापर्यंत 9 हजार 814 अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. काही अर्जामध्ये कागदपत्रांचा अभाव, तर काहींनी नियमांचे पालन केलेले नाही, अशा अर्जाचा समावेश आहे. याचसोबत 5 हजार 814 अर्ज किरकोळ कारणासाठी काही काळ नाकारण्यात आले आहेत. म्हणजेच पुणे शहरात 6 लाख 82 हजार 55 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 6 लाख 67 हजार 40 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर 3 हजार 494 अर्ज अपात्र ठरले आहेत.
हवेली तालुक्यात सर्वाधिक अर्ज
हवेली तालुक्यात सर्वाधिक अर्ज नोंदवले गेले आहेत. 4 लाख 19 हजार 859 अर्जांपैकी 4 लाख 15 हजार 510 अर्ज मंजूर झाले आहेत. तिथे अर्जदार महिलांचा प्रतिसाद लक्षात घेता, विशेष प्रक्रिया राबवली जात आहे.
उर्वरित अर्जांची छाननी सुरू
अजून 12 हजार अर्जाची छाननी प्रलंबित असून ती लवकरच पूर्ण होईल. या योजनेत महिलांना आर्थिक मदत तसेच विविध कल्याणकारी सुविधा मिळतील, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
पुढील टप्प्यांविषयी लवकरच घोषणा
पुणे जिल्ह्यातील अर्जदार महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास सुधारित कागदपत्रे सादर करून अर्जदारांना योजनेचा लाभ मिळवता येईल. राज्य सरकार लाडकी बहिण योजनेच्या पुढील टप्प्यांविषयी लवकरच घोषणा करेल. यामुळे महाराष्ट्रातील महिलांना अधिक सुलभ आणि प्रभावी कल्याणकारी सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.