उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतून मोठी घोषणा केली राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी ६ हजार रुपये देण्यासाठी ‘लाडका शेतकरी योजना’ सुरु केली जाणार आहे. ही योजना केंद्राच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारच्या निधीतून असेल. यावेळी बोलताना “शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या जीवापेक्षा प्रिय असते. त्यांच्या हक्कांचं रक्षण करणं, हे माझं कर्तव्य आहे,” असं ठाम वक्तव्य करत फडणवीसांनी विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.
२००६ ते २०१३ दरम्यान अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय
पूर्वीच्या सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी थेट खरेदी करून त्यांना कमी मोबदला देण्यात आला होता. त्या काळातील फसवणुकीच्या प्रकरणांवर भाष्य करत फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांचे हक्क गोठवण्यात आले, त्यांच्या कष्टाचा मोबदला दिला गेला नाही, हे फार वेदनादायक होतं.” त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन जमिनीच्या किंमतीच्या ५ पट मोबदल्याचा शासन निर्णय लागू केला.
डिजिटल क्रांती व योजनांचा वर्षाव
शेतजमिनींचं ड्रोन आणि उपग्रहाद्वारे डिजिटायझेशन
बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत नवीन प्रकल्पांना मंजुरी
७ जिल्ह्यांना दुष्काळमुक्त करणारा वैनगंगा-नलगंगा नदीजोड प्रकल्प
टेक्सटाईल पार्क्समुळे २ लाख रोजगार
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी छोटे प्रकल्प
प्रकल्पग्रस्तांना रोजगारासाठी कर्ज
समृद्धी महामार्ग
“५५ हजार कोटींचा महामार्ग वेडेपणाचं स्वप्न वाटलं होतं, पण आज तो विदर्भाला जोडणारा श्वास आहे,” असं म्हणत फडणवीसांनी समृद्धी महामार्गाच्या यशावरही भर दिला.
“राजकारण नाही, केवळ शेतकऱ्यांचा हक्क!”
फडणवीसांनी स्पष्ट केलं की ही योजना केवळ राजकीय घोषणा नाही, तर २००६ ते २०१३ दरम्यान फसवले गेलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारी क्रांतिकारी पावले आहेत. “कोणत्याही दलालाच्या फंदात न पडता, आमदार-मंत्र्यांशी थेट संपर्क साधा,” असंही त्यांनी आवाहन केलं.