हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना (Ladka Shetkari Yojana) आणि लाडका भाऊ योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत सरकार कडून केली जात आहे तर लाडक्या भावांना सुद्धा नोकरी करत पैसे दिले जाणार आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठी घोषणा केली आहे. आता राज्यात “लाडका शेतकरी योजना” राबवणार आहे असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. त्यामुळे राज्यातील बळीराजाला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
सुखी शेतकरी हेच सरकारचं धोरण- Ladka Shetkari Yojana
बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना (Ladka Shetkari Yojana) राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार . महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबिनला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे करणार आहोत. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला ५ हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही ५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा २ हेक्टरपर्यंत असणार आहे”, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.