हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । राज्यातील गरीब महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी महायुती सरकारने मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हि योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाते. गरीब आणि गरजू महिलांच्या आर्थिक भल्यासाठी सरकारने हि योजना आणली आहे, मात्र त्याचा लाभ गलेलठ्ठ पगार असलेल्या सरकारी कर्मचारी महिलाही घेत असल्याचं आता समोर आलं असून मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील 2652 सरकारी कर्मचारी लाडक्या बहिणी निघाल्या आहेत. एकीकडे भरगोस पगार सुरु असताना, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत असतानाही १५०० रुपयांचा मोह या महिलांना सुटला नाही. अखेर त्यांचं पितळ आता उघड पडलं असून सरकार त्यांच्यावर मोठी कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.
खरं तर ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु झाली होती त्याच वेळी सरकारने या योजनेसाठी काही अटीशर्ती घातल्या होत्या. त्यानुसार, सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं शासनाने स्पष्ट केलं होत. मात्र तरीही सरकारला गंडा लवत आत्तापर्यंत या महिलांनी दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये लाटलेच. यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता मात्र हा प्रकार उघडा पडला आहे.
सरकार पैसे वसूल करणार Ladki Bahin Yojana
माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. महत्वाची बाब म्हणजे या महिलांनी आत्तापर्यंत 9 महिन्यांत प्रत्येकी 13 हजार 500 रुपयांचा लाभ घेतला आहे. हा आकडा 3 कोटी 58 लाख रुपयांवर जातोय. आता सरकार हे सर्व पैसे सदर सरकार महिलांकडून वसूल करणार असल्याचं बोललं जातंय. प्रत्येक विभागाला त्या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




