Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये बदल!! सरकारने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. आत्तापर्यंत २ महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. मात्र अजूनही काही महिलांनी अर्ज भरले नाहीत किंवा त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत. मात्र आता या योजनेत राज्य सरकारने एक बदल केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती. लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन, ग्रामसेवक , आपले सेवा सरकार अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना प्राधिकृत करण्यात आले होते. सरकारकडून त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये दिले जात होते. पण, आता केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील. राज्य सरकारने याबाबत शासन आदेश जारी केला आहे.

गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारचं पाऊल- Ladki Bahin Yojana

राज्यभरातील कोट्यवधी महिला या योजनेशी जोडल्या गेल्याने आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या कमी होत आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. पुन्हा अशा प्रकारे गडबड होऊ नये यासाठी सरकार खबरदारी घेत आहे.