सोन्याच्या किमतीला मागे टाकणाऱ्या जमिनींचा उदय सध्या पुरंदर तालुक्यात पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प आणि नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागातील जमीन व्यवहार अक्षरशः उसळी मारत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत जेवढे व्यवहार झालेत, ते मागील बारा महिन्यांच्याही पुढे गेले आहेत!
विकासाच्या संधीने उजळला पुरंदर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक कोंडीला तोडगा म्हणून रिंगरोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दुसरीकडे, बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळही पुरंदरमध्येच होणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केल्यावर, स्थानिक परिसरात विकासाची लाट उसळली आहे. वनपुरी, कुंभारवळण, खानवडी, पारगावसारख्या गावांमध्ये प्लॉटिंगला वेग आला असून जमिनींच्या किंमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
जमिनींना ‘पाचपट’ भाव
रिंगरोडसाठी भूसंपादन झालेल्या जमिनींना पाचपट दर मिळाल्याने स्थानिक शेतकरीही समाधानी आहेत. सुरुवातीला विरोध करणारे अनेक शेतकरी आता चांगल्या दरात व्यवहार करत आहेत. काहींनी इतरत्र जमीन विकत घेऊन पुनर्वसनही केलं आहे.
गुंतवणूकदारांची गर्दी, दलालांचा धावता बाजार
मुंबई-पुण्यातील गुंतवणूकदारांनी या भागाकडे लक्ष वळवलं असून, मागणी वाढल्याने जमिनींची किंमत सोन्याला स्पर्धा देऊ लागली आहे. रिसे, टेकवडे, गराडे, कोडीत बुद्रुक यांसारख्या गावांमध्ये एक गुंठा जमीन विकत घेण्यासाठी लोक सरसावले आहेत.
१०० एकरांहून अधिक प्लॉटिंग पूर्ण – विक्रीला सुरुवात
आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सात प्रमुख गावांमध्ये प्लॉटिंगचे काम पूर्ण झाले असून १ ते ११ गुंठ्यांचे प्लॉट तयार करून विक्रीला काढण्यात आले आहेत. सवलतींसह विविध ऑफर्सही सुरू असून व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे.
पुरंदर – ‘नवीन हॉटस्पॉट’ गुंतवणुकीसाठी
विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका सध्या पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला भाग ठरत आहे. विमानतळ आणि रिंगरोडसारख्या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षांत हा परिसर ‘नवीन पुणे’ म्हणून उदयाला येणार, अशी गुंतवणूकदारांची भक्कम खात्री आहे.




