औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी वेरूळ परिसरात असलेल्या बिबट्याने गुरूवारी सकाळी सुलीभंजनकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना पुन्हा एकदा दर्शन दिल्याने सुलीभंजन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला समजताच पथकाने या परिसरात शोध मोहीम राबवली.
नागरिकांनी सतर्क राहावे व जंगल परिसरात प्रवेश करु नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर यांनी केले आहे. सुलीभांजन येथील दत्त मंदिरात अनेक पर्यटक जातात. पावसाळ्यात येथे निसर्गरम्य वातावरण असते. काल दत्त मंदिराकडे जात असताना एका पर्यटकाने कार मधून बिबट्याचा व्हिडिओ घेतला तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काल सायंकाळपर्यंत ग्रामस्थ व वन विभागातर्फे या बिबट्याच्या शोधासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. नागरिकांनी त्याची छेड काढू नये दिसल्यास वन विभागाला कळवावे असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.