हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एलआयसीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल. ज्यांच्याकडे कौशल्य असूनही आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणासाठी अडथळे येतात, त्यांच्यासाठी हि योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे.
योजना दोन गटात
ही योजना दोन गटांमध्ये विभागली आहे. पहिल्या विभागात जनरल शिष्यवृत्ती येत असून , त्यामध्ये वैद्यकीय (MBBS/BDS) आणि अभियांत्रिकी (B.E/B.Tech) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या विभागात व्यावसायिक अभ्यासक्रम आणि सरकारी महाविद्यालयातून आयटीआय डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. म्हणजेच दहावीच्या पुढे आयटीआय किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा करणाऱ्या मुलींसाठी वेगळी शिष्यवृत्ती उपलब्ध असणार आहे.
पात्रता
या योजनेत पात्रतेनुसार विद्यार्थी दहावीमध्ये किमान 60% गुण किंवा त्यासोबत CGPA मिळवलेले असणे आवश्यक असून , बारावी तसेच डिप्लोमा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या सर्व अटींसोबत अर्जदाराचे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेच्या आत असावे.
विशेष शिष्यवृत्त्या उपलब्ध
विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासास मदत मिळते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 40000 रुपये दिले जातात, तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती 30000 रुपये प्रतिवर्ष आहे. आयटीआय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 20000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय मुलींसाठी एक विशेष शिष्यवृत्ती आहे. ज्यांत दोन वर्षांसाठी 15000 रुपये दिले जातात, आणि प्रत्येक हप्त्याला 7500 रुपये दिले जातात. या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चात मदत करतात.
शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी योजना
विद्यार्थ्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. एलआयसी गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती योजना ही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्यामुळे अनेक आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न साकार होण्यास मदत मिळणार आहे.