विवाहितेवर अत्याचार करून खून करणाऱ्यास जन्मठेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | अत्याचार केल्यानंतर तोंड व गळा दाबून महिलेचा खून केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कराडचे जिल्हा सत्र न्या. व्ही. व्ही. कठारे यांनी ही शिक्षा ठोठावली. करण शंकर कोळी (मुळ रा. ओकोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर, सध्या रा. साकुर्डी, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे.

सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, येणपे येथील 22 वर्षीय विवाहीता 28 आॅगस्ट 2018 रोजी गावालगतच्या शिवारात जनावरे चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी पती त्याठिकाणी आल्यानंतर विवाहितेने सर्व जनावरे त्यांच्याकडे दिली. जनावरे बांधण्यासाठी पती वस्तीवर निघून गेला. तर विवाहिता एकटीच पायी चालत घराकडे निघून गेली. रात्री सात वाजण्याच्या सुमारास पती घरात पोहोचला. त्यावेळी पत्नी घरी आली नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे पतीसह नातेवाईकांनी शिवारात शोध घेतला. मात्र, विवाहिता आढळून आली नाही. त्यामुळे याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

पोलीस तपास करीत असतानाच दुसऱ्या दिवशी दुपारी संबंधित विवाहितेचा मृतदेह शिवारामध्ये आढळून आला. विवाहितेवर अत्याचार करुन खून करण्यात आल्याचे समोर येताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यावेळी करण शंकर कोळी या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्याकडे तपास केला असता, विवाहिता घरी निघाली असताना निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार केल्याचे तसेच त्यानंतर गळा दाबून तीचा खून केल्याचे आरोपीने कबुल केले. तसेच विवाहितेचे कपडेही त्याने जाळून टाकले होते.

तत्कालिन पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे व पोलीस निरीक्षक अशोक क्षिरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. परमाज यांनी काम पाहिले. त्यांनी या खटल्यात १७ साक्षिदार तपासले. सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या महत्वपुर्ण साक्षी तसेच सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी करण कोळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.