अनैतिक संबधातून पुरूषाचा खून करणाऱ्या महिलेस जन्मठेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | नांदवळ (ता. कोरेगाव) येथे शेतकऱ्याच्या खूनप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सीमा नामदेव चव्हाण (वय- 30, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे संबंधित महिलेचे नाव आहे. अनैतिक संबधातून होणाऱ्या वादावादीतून महिलेने शैलेश अशोक भोईटे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) यांचा खून केला होता.

याबाबतची माहिती अशी, नांदवळ येथे हुपळी नावाच्या शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये 19 जुलै 2017 रोजी शैलेंद्र उर्फ शैलेश यांचा सकाळी नऊ ते साडेअकराच्या सुमारास खून झाला होता. आरोपी महिला त्यांच्या शेतात आठ महिन्यांपासून मजुरीचे काम करत होती. या दरम्यान त्यांच्यात अनैतिक संबंध आले. त्यातून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यातून आरोपीने पूर्वतयारी करून शैलेश यांच्या डोळ्यात अचानक मिरचीची पावडर टाकली. त्यामुळे ते बेचैन होऊन पळू लागले. सीमाने लोखंडी सत्तूराने गळ्यावर, डाव्या खांद्यावर आणि कपाळावर सपासप वार करून त्यांचा निर्दयी खून केला होता. याबाबत सूरज भोईटे (रा. वाघोली) याने वाठार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एम. यु. वैरागकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश मंगला थोटे यांच्या न्यायालयात सुरू होती. या कामी सहायक जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक यांनी काम पाहिले. यावेळी एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षीवरून, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सीमा चव्हाण हिस जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिने साधी कैद अशी शिक्षा केली.

या खटल्यासाठी पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रकाश चव्हाण यांनी पाठपुरावा केला. प्रॉसिक्यूशनचे स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, मंजूर मणेर, रहिनाबी शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी परिश्रम घेतले.