नागपुरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळांना सुट्टी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  नागपुरात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूरमध्ये काल रात्रीपासून विजांच्या कडकडासह 106 मिलीमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य निर्माण झाले आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरांमध्ये अनेक भागात पाणी साचून राहिले आहे. ओढे, नाले सर्वकाही तुंबले आहेत. तसेच, नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनीमधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. इतकेच नव्हे तर, अनेक भागांत वीज खंडित करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाचा वेग कायम

नागपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने नागपुरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर रात्री दोन वाजल्यापासून नागपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. ते आज सकाळपर्यंत या पावसाचा वेग कमी झालेला नाही. त्यामुळे, नागपूर जिल्हा व महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहराच्या सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सध्या जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहेत. तसेच, नागरिकांनी महत्त्वाच्या कामांशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज दिवसभरात मुसळधार पावसाचा वेग कमी झाला नाही तर प्रशासनाकडून पुढील पावले उचलली जातील.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

मुख्य म्हणजे, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये तसेच ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. नदी, नाले गच्च भरून चालल्यामुळे कोणीही पूल ओंढाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, पाणी कमी झाल्यानंतर पुल ओलांडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. त्यामुळे जर कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.