Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात ठाकरे- पवार पॅटर्न चालणार? की भाजप पुन्हा मुसंडी मारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असून देशातील सर्वच राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. तर दुसरीकडे भाजपची १० वर्षाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. अबकी बार ४०० पार असा नारा भाजपने दिला असून त्यादृष्टीने रणनीती आखली जात आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर महाराष्ट्र सारख्या राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण गरजेचं आहे याची जाणीव भाजपला आहे. यामुळेच आधीच एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार याना सत्तेत सामील करण्यात आलं. याशिवाय काँग्रेसच्या काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या चर्चा सुद्धा सुरु आहेत. मात्र एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा राज्यात भाजप यश मिळवेल कि पवार- ठाकरे पॅटर्न चालेल हे कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवून एकूण 39 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आणि राज्यात भाजपला एकटं पाडलं. महाविकास आघाडी एकत्र असताना भाजपला प्रत्येक निवडणुकीत अपयश आलं. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिंदे- भाजप सरकार आलं. वर्ष पार पडत न तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) सुद्धा शरद पवारांशी फारकत घेऊन ४० आमदारांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांसारख्ये नेते हाताला लागल्याने भाजपची ताकद नक्कीच वाढलेली आहे.

पवार- ठाकरेंना जनतेची सहानभूती – Lok Sabha Election 2024

दुसरीकडे ज्याप्रकारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शिवसेना- राष्ट्रवादीतून बंडखोरी केली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने ज्याप्रकारे या दोन्ही नेत्यांच्या ताब्यात मूळ पक्ष दिला त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Pawar- Thackeray) यांच्यावर अन्याय झाल्याची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. याचाच परिणाम म्हणजे लोकांच्या मनात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या प्रति सहानभूती आहे. पक्ष गेला, चिन्ह गेलं, आमदार गेले तरी सर्वसामान्य मतदार दोन्ही नेत्यांच्या पाठीशी उभं राहिल्याचे चित्र दिसत आहे. पवार आणि ठाकरेंच्या सभांना मोठी उपस्थिती पाहायला मिळतेय. भाजपसहित अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

त्यातच राज्यात महायुती सरकार आल्यापासून महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योगधंदे, मुंबईचे कमी झालेले महत्व, वाढती बेरोजगारी, महागाई तसेच सध्या तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सरकारच्या विषयी जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. देशात जरी भाजपला यश मिळत असल्याचे दिसत असले तरी महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे. इथे शरद पवार आजही लोकांच्यात फिरत आहेत, उद्धव ठाकरे एकामागून एक झंझावाती दौरे करत आहेत. त्यांच्या जोडीला काँग्रेसही आहे. देशात इंडिया आघाडी गडबडली असली तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंघ आहे. महत्वाचे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची साथ यंदा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्याचाही फटका भाजपला बसू शकतो . सध्याच्या सर्वेनुसार राज्यातील ४९ लोकसभेच्या जागांपैकी (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीला २० ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप प्रणित महायुतीला २५ ते २७ जागा मिळू शकतात. म्हणजेच २०१९ च्या तुलनेत NDA चा आकडा कमी होण्याची शक्यता आहे.