Lok Sabha Election 2024 : रणधुमाळी लोकसभेची!! आजपासून पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जागांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच मतदानाच्या तारखा जाहीर केल्या होती. यंदा ७ टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतची अधिसूचना आज निघणार असून उमेदवार त्यांचे अर्ज भरू शकतात. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

19 एप्रिल रोजी 21 राज्यांमधील एकूण 102 जागांसाठी मतदान होणार. या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मार्च आहे. तर बिहारसाठी ही तारीख २८ मार्च आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे, तर बिहारमध्ये 2 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर याठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

निवडणुकीची अधिकसुचना (Lok Sabha Election 2024 Notification) जारी झाली तरीही महायुती आणि महाविकास आघाडीकडून या ५ ही मतदारसंघातील सर्वच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपने नागपुरातून नितीन गडकरी आणि चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि रामटेक मधून लोकसभेसाठी कोण उभं राहील हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था यापेक्षा वाईट आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचे नाव लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेलं नाही. येत्या २-३ दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती आपापले उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यातील किती मतदारसंघात मतदान होणार – Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तामिळनाडूमधील 29, राजस्थानमधील 12, उत्तर प्रदेशमधून 8, मध्य प्रदेशमधून 6, उत्तराखंड, आसाम आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 5, बिहारमधून 4, पश्चिम बंगालमधून 3, अरुणाचल प्रदेश, मणिपूरमधून प्रत्येकी 2, मेघालय आणि छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, नागालँड, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी येथे प्रत्येकी 1 जागेसाठी मतदान होणार आहे.