हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात म्हाडाच्या घरांची (Mhada Lottery 2023) मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठीचे अर्ज कधी सुटतील याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. अशा लोकांसाठीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी म्हाडाच्या कोकण मंडळ क्षेत्रातील 5 हजार 309 घरांसाठीची सोडत निघणार आहे. तसेच आजपासूनच ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या सोडतीमुळे पुन्हा एकदा अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आज म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाकडून ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग अशा भागातील घरांसाठीचे सोडतीचे अर्ज प्रसिद्ध केले जातील. आज सकाळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होर्ईल. तसेच या घरांच्या अर्जांची संगणकीय सोडत सात नोव्हेंबर रोजी सुरु करण्यात येईल.
म्हाडाच्या अनेक घरांची विक्री नाही
मे 2023 मध्ये कोकण विभागात 4,654 घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery 2023) काढण्यात आली होती. मात्र लॉटरीमधील अनेक घरांची विक्री अद्याप झाली नाही. शिवाय प्रथम प्राधान्य आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील घरांना अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या सोडतीतील उर्वरित घरांसाठी तसेच म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. ही सोडत गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये काढण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव या सोडतीला विलंब झाला. आता याच सोडतीची जाहिरात आज प्रसिद्ध केली जाणार आहे.
5 हजार 309 घरांची सोडत- Mhada Lottery 2023
कोकण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये 5 हजार 309 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या घरांची जाहिरात शुक्रवारी म्हणजेच आज प्रसिद्ध होणार आहे. तसेच आजपासूनच सोडतीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. या सोडतीमध्ये EWS, अल्प उत्पन्न गट, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे. तर 20 टक्के घरे सर्वसमावेशक योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील असतील.
दरम्यान, मुंबई भागात देखील नुकतीच घरांची सोडत जाहीर झाली आहे. सध्या मुंबईतील घरांच्या किमतींचे रेट वाढल्यामुळे नागरिक जास्त म्हाडाच्या घरांना प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घराच्या (Mhada Lottery 2023) सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. आता कोकण विभागाकडून 5 हजार 309 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. कोकणनंतर म्हाडाकडून इतर भागातील घरांची देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु तोपर्यंत घर खरेदी इच्छुकणाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.