Wednesday, October 5, 2022

Buy now

लम्पीबाधित जनावरांच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार; राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात लम्पी व्हायरस मुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लम्पी विषाणूची लागण झालेल्या पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करेल अशी घोषणा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पुणे येथील आढावा बैठकीनंतर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल. तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राज्यासाठी एका आठवड्यात ५० लाख लसमात्रा उपलब्ध होतील. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक व पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असे निर्देश विखे पाटील यांनी यावेळी दिले. या आजारावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ५ किमी परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण केले जात असून येत्या काळात हा वेग अधिक वाढेल अशी माहिती त्यांनी दिली

लम्पीने मृत झालेल्या जनावरांसाठी मदत देण्यात येईल. त्यानुसार गाय-३० हजार, बैल-२५ हजार व वासरू-१६ हजार रुपयांप्रमाणे मदत मिळेल. म्हशींवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसत नसल्याने यासंदर्भातील केंद्र सरकारची मंजुरी घेऊन बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही विखे पाटील म्हणाले.