कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. चाकरमानी आवर्जून कोकणात जात असतात. कोकणात जाण्यासाठी बस आणि रेल्वेची खास सोय परिवहन महामंडळ आणि रेल्वे विभागाकडून करण्यात आली होती. आता चाकरमान्यांना परतीची चिंता वाटत असेल तर काही काळजी करू नका कारण त्याची देखील सोय रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे. कोकणातून परतणाऱ्या प्रवांशांकरिता कोकण रेल्वे पुन्हा सज्ज झाली आहे.
रेल्वे विभागाच्या वतीनं मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेच्या वतीनं पनवेल ते मडगावदरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.
काय असेल वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01428 ही विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार आहे. 01427 ही गाडी 15 सप्टेंबरला पनवेलहून रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून, मडगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे.
‘या’ स्थानकांवर घेणार थांबे
पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी अशा स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
याबरोबरच या गाडीला तीन तृतीय वातानुकूलित डबे, एक द्वितीय वातानुकूलित डबा, दोन तृतीय इकोनॉमी वातानुकूलित डबे, आठ स्लीपर, पाच सामान्य द्वितीय अशी व्यवस्था असेल.
कुठे कराल आरक्षण ?
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या रेल्वेसाठीचं आरक्षण आणि सर्व माहिती आरक्षण केंद्रांसह (IRCTC) आयआरसीटीसी या संकेस्थळावर च्या संकेतस्थळावर 10 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.