सोलापूर प्रतिनिधी । माढा तालुक्यात स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांनी पळवलेल्या रस्त्याचे काम अखेर थांबण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रस्ते कामाच्या स्थागितीसाठी गेल्या काही दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आपले उपोषण आता मागे घेतले आहे. याबाबतचा लेखी आदेश मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले आहे.
माढा तालुक्यात वडशिंगे ते रेल्वे स्टेशन दरम्यानचा १ कोटी ८६ लाख रुपयांचा दोन किलोमीटरचा रस्ता अन्यत्र पळवण्यात आला होता. रस्ता परत मिळावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
मात्र विविध माध्यमांतून या घटनेची माहिती लोकांपर्यंत आणि प्रशासनाकडे गेल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वेगळ्या जागी सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्याचा इशारा दिला. अखेर लेखी आदेशाची प्रत हाती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले आहे.